पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावे एक फेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान सोशल मीडियावर CJI चंद्रचूड यांचा फोटो आणि त्यांच्या हवाल्याने व्हायरल होणारी पोस्ट ही खोटी आणि खोडसाळ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या (DY Chandrachud) जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने(PRO) सोमवारी (दि.१४) सोशल मीडिया आणि मेसेंजर अॅप्सवर भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांचा हवाला देत फेक पोस्ट व्हायरल होत आहे. अशा कोणत्याही प्रकारची अधिकृत पोस्ट सरन्यायाधिशांकडून जारी करण्यात आलेली नाही. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या पीआरओने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात (DY Chandrachud) म्हटले आहे.
DY चंद्रचूड यांनी आवाहन करण्यात आली असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फेक पोस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी जनतेला 'हुकूमशाही सरकार' विरुद्ध त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी एकत्र येण्याचे आणि रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्ध पत्रक जारी करत, CJI चंद्रचूड यांनी अशी कोणतीही पोस्ट जारी करत, कोणत्याही प्रकारचे जनतेला आवाहन केले नाही, असे स्पष्ट केले आहे.