Justice DY Chandrachud | प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश! न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

Justice DY Chandrachud | प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश! न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी. वाय. चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी बुधवारी (दि.९) पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता.

लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ ७४ दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता. आता न्या. चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून १३ मे २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते.

सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर याआधी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, त्यांच्या वडिलांचा सरन्यायाधीश म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ जवळून पाहिला आहे. त्याच्या वडिलांचा काळ आणि सध्याच्या काळात काय फरक आहे? यावर बोलताना त्यांनी, फरक फक्त आधुनिक जीवनाच्या आणि समाजाच्या गुंतागुंतीच्या संदर्भात असल्याचे म्हटले आहे.  कायद्याच्या अंमलबजावणीत समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. समाज अधिक गुंतागुंतीचा झाला आहे, असे न्या. चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी नमूद केले होते.

ते पुढे म्हणाले की "सर्व बदल होऊनही काही मूलभूत मूल्ये आहेत जी शाश्वत राहतात. बंधुत्व, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि समानता ही मुळात घटनात्मक मूल्ये आहेत. १९५० किंवा २१ व्या शतकातील तिसरे दशक असो, आपला समाज आणि राष्ट्र मजबूत करण्यासाठी आपण त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.".

न्यायपालिका ही याचिकाकर्त्यांसाठी न्याय मिळण्याचे चांगले ठिकाण बनेल यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. "देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे." असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश

ही एक ऐतिहासिक घटना आहे, कारण प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीशपदी विराजमान झाला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत म्हणजे जवळपास सात वर्षे ते सरन्यायाधीश होते. वडील निवृत्त झाल्यानंतर जवळपास ३७ वर्षांनी धनंजय चंद्रचूड त्याच खुर्चीवर विराजमान झाले आहेत. चंद्रचूड यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या वडिलांचे २ मोठे निर्णयही बदलेले आहेत. ते आपल्या ठाम निर्णयांसाठी ओळखले जातात. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०१४ म्हणजे दोन वर्षांचा असेल.

डी. वाय. चंद्रचूड १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. त्यांनी ३१ ऑक्टोबर २०१३ ते १३ मे २०१६ दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ दरम्यान ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. दिल्ली विद्यापीठातील कॅम्पस लॉ सेंटरमधून त्यांनी एलएलबी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड स्कूलमघून एलएलएम आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.

महाराष्ट्राचे सुपूत्र

डी. वाय. चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांचे मूळ गाव कनेरसर (ता. खेड) आहे. त्यांच्या या मूळ गावाला देशाला दोन सरन्यायाधीश देण्याचा बहुमान मिळाला आहे, याचा सार्थ अभिमान कनेरसर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. कनेसरचे हे चंद्रचूड कुटुंब कुशाग्र बुद्धिमत्तेचे म्हणून ओळखले जाते. कनेरसर (ता. खेड) येथे आजही त्यांचा प्रशस्त असा भव्य वाडा सुस्थितीत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पूर्वज चंद्रचूड हे पेशव्यांचे वकील म्हणून ओळखले जात. त्यांना खेड तालुक्यातील कनेरसरसह सात गावे वतन म्हणून पेशव्यांनी दिली होती. कनेरसर या ठिकाणी सुमारे २५० वर्षांपूर्वीचा त्यांचा वाडा अजूनही सुस्थितीत आहे. तसेच, चंद्रचूड कुटुंबाची शेती ही पूर-कनेरसर या गावांमध्ये आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news