Dunzo laying off | रिलायन्स, गुगल फंडेड ‘डंझो’ भारतीय कंपनीतील १५० हून अधिक कर्मचार्‍यांना नारळ!

Dunzo laying off
Dunzo laying off

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून पाश्चिमात्य देशात मोठी आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात आयटी आणि तंत्रज्ञान कपंन्यांना बसत आहे. याचे पडसाद काही प्रमाणात भारतामध्येदेखील दिसून येत आहेत. मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आणि गुगलची गुंतवणूक असलेल्या डंझो कंपनीने १५० हून अधिक कर्मचार्‍यांना नारळ दिल्याचे एका अहवालात स्पष्ट केले आहे. (Dunzo laying off)

अमेरिकेत अनेक कंपन्यांनी आर्थिक नियोजनाचे कारण देत, अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये गुगल, ट्विटर, फेसबुक, मेटा अमेझॉन यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी आणि तंत्रज्ञान कंपन्यादेखील खर्च कपात करण्याच्यादृष्टीने पावले उचलत आहेत.

फायनान्शिअल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, डंझो कंपनीने सध्याच्या निधीच्या तुटवड्यामुळे 30-40 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. दरम्यान कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, पुढील वर्षी (२०२४) जानेवारीमध्ये या कर्मचाऱ्यांचे पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट मिळतील. कंपनीच्या एका छोट्या बैठकीमध्ये कंपनीने या नोकरकपातीबाबत कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे माहिती दिली आहे. (Dunzo laying off)

Dunzo laying off : २०२३ मध्ये कंपनीने ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले

डंझो या कॅश-स्ट्रॅप्ड डिलिव्हरी स्टार्टअप कंपनीमध्ये रिलायन्स आणि गुगलसह इतर गुंतवणूकदार कंपनींची 250 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. या स्टार्टअपने यावर्षी (२०२३) नोकरीच्या दोन फेऱ्यांमध्ये जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. दरम्यान फंडाच्या तुटवड्यामुळे डंझो कंपनीने कर्मचार्‍यांचे जून आणि जुलै महिन्यांचे पगार देण्यासाठी विलंब केला होता. डंझो कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ कबीर बिस्वास यांच्या म्हणण्यानुसार, स्टार्टअप खर्च कमी करण्यासाठी कंपनी बंगळूरमधील आपले कार्यालय देखील रिकामे करू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

डंझो (Dunzo) कंपनीविषयी

डंझो ही एक भारतीय ऑनलाइन कंपनी आहे. ती फूड आणि जीवनावश्यक वस्तूंची घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा देते. बंगळूर, दिल्ली, गुरुग्राम, पुणे, चेन्नई, जयपूर, मुंबई आणि हैदराबाद या भारतातील मेट्रो सिटीमध्ये ही कंपनी होम डिलिव्हरी देते. Dunzo कडून बंगळूरमध्ये किराणा, भाजीपाला, फळे, दूध, मांस, मासे, पान वस्तू आणि बरेच काही 19 मिनिटांत झटपट डिलिव्हरी मिळवता येते. तसेच ही कंपनी गुरुग्राममध्ये बाइक टॅक्सी सेवादेखील चालवते. त्याचे मुख्यालय बंगळूर येथे आहे. २०१७ पासून या कंपनीला गुगलद्वारे फंडिंग केले जाते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news