दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र कोरडे; शेतकरी हवालदिल

दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र कोरडे; शेतकरी हवालदिल

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीचे पात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीसच कोरडे पडल्याने येथील दत्तवाड, घोसरवाड, दानवाड, टाकळीवाडी आदी गावातील महिला नागरिक व व शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहेत.

संबंधित बातम्या 

घरातील गरजेसाठी व पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी नागरिक महिला वर्गांना विहिरी, कोपनलिका, बोरवेल्स आदींचा आधार घ्यावा लागत आहे. उन्हाचा तडाका वाढल्याने पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तर पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत ही वाढ झाली आहे. दूधगंगा नदी काठाची अशी अवस्था असताना इचलकरंजीला पाणी दिल्यास काय परिस्थिती होईल? याची जोरदार चर्चा या परिसरातील ग्रामस्थ शेतकरी व महिला वर्गात सुरू आहे.

सध्या ऊस तुटून गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी लागवडी टाकून खोडवा उसाचे संगोपन करण्यासाठी भरणी केली आहे. मात्र, नदीपात्र कोरडे पडल्याने इतकी महागडे लागवड टाकून केलेले श्रम वाया जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जून या चार- पाच महिन्यात दूधगंगा नदी पात्र पाच- सहा वेळा कोरडे पडते. गेल्या वर्षी तर तब्बल नऊ वेळा दूधगंगा नदीपात्र कोरडे पडले होते. सध्या दूधगंगा नदीवर कोणतीही मोठी योजना अद्याप तरी कार्यान्वित नाही.

मात्र, कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन तसेच गांधीनगरसह तेथील १३ गावासाठी कागल येथून मंजूर झालेली योजना तसेच नुकतेच मंजूर झालेली हुपरी येथील योजना व त्यात सर्वात मोठी धोक्याचे घंटा म्हणजे, इचलकरंजी सारख्या मोठ्या शहराला मंजूर झालेली अमृत २ योजना या सर्व योजना जर कार्यान्वित झाल्या तर दूधगंगा नदी काठाला दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील महिला ग्रामस्थ शेतकरी वर्गात प्रशासनाविरोधात कमालीची नाराजी पसरली आहे. कोणत्याही परिस्थितीत अमृत २ इचलकरंजीसाठी मंजूर झालेली योजना कार्यान्वित होऊ द्यायची नाही असा निर्धार या सर्वांनी केला आहे.

सध्या उन्हाचा तडाका वाढू लागल्याने शेतकरी वर्गासाठी तर पिकांना जगवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात -लवकर दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याचे व्यवस्था करावी अशी मागणी दतवाडसह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news