पुढारी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. सुरुवातीला रशियाने हे युद्ध काही दिवसातच जिंकू अशी वल्गना केली होती. पण युक्रेने अतिशय चिवट लढा देत रशियाचा मुकाबला केला आहे. आता तर युक्रेनच्या ड्रोननी थेट रशियाची राजधानी मास्कोवर हल्ला चढवला आहे. मास्कोवरील ड्रोन हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
या ड्रोन हल्ल्यानंतर शहरातील बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये मोठे स्फोट झाले. मास्कोचे महापौर सैरजी सोब्यानीन यांनी हे ड्रोन पाडल्याची माहिती दिली आहे. बीबीसीने दिलेल्या बातमीत युक्रेनची ड्रोन हल्ल्यांची ही नवी मालिका असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर या हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण युक्रेनने या हल्ल्याबद्दल मौन बाळगले आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्थानिक प्रमाण वेळेनुसार दुपारी चार वाजता हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, "शहराती हवाई सुरक्षा व्यवस्था कार्यरत केल्यानंतर या ड्रोनने मार्ग बदलला आणि ते एका अनिवासी इमारतीवर जाऊन पडले. हे ड्रोन ज्या ठिकाणी पडले तेथे सरकारी इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत."
या हल्ल्यात जीवितहानीबद्दलची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रशियाच्या सरकारी मालकीची वृत्तसंस्था Tassने या हल्ल्यात संबंधिती इमारतीची भिंत पडल्याची माहिती दिली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाची मास्कोला झळ बसली नव्हती. पण ३० मे आणि ३१ जुलै या दोन दिवसांत युक्रेनने मास्कोवर ड्रोनने हल्ले केले. युक्रेनने या हल्ल्यांचे समर्थन केले होते. युक्रेनने रशियाच्या नौदलावरही ड्रोनने हल्ला केला होता. पण रशियाने हे ड्रोन यशस्वीरीत्या पाडले होते.
हेही वाचा