Teacher Dress Code : राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू : जीन्स पँट, टी शर्ट घालण्यावर बंदी

Teacher Dress Code : राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू : जीन्स पँट, टी शर्ट घालण्यावर बंदी


कंधार: राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील कार्यरत शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता शिक्षकांना शाळेत जीन्स पॅन्ट व टी शर्ट घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर यापुढे शिक्षकांच्या नावासमोर मराठीत 'टी' तर इंग्रजीत 'Tr' संबोधन लावण्याचा निर्णयही दि. १५ मार्चरोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे घेतला आहे. Teacher Dress Code

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांच्याकडे गुरु, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशावेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. Teacher Dress Code

सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल. तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा, याबाबत परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत 'Tr' तर मराठी भाषेत 'टी' संबोधन लागणार

शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत 'Tr' तर मराठी भाषेत 'टी' असे संबोधन लावण्यात यावे. तसेच, यासंदर्भातील बोधचिन्ह आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुनिश्चित करुन त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल.

Teacher Dress Code  : शाळेमध्ये जीन्स व टी-शर्ट असा पेहराव नको

सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/ चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news