कोल्हापूर : शिक्षणाधिकार्‍यांसमोरच टक्केवारीवर चर्चा; आ. आसगावकरांकडून शिक्षण विभागाचे अधिकारी धारेवर | पुढारी

कोल्हापूर : शिक्षणाधिकार्‍यांसमोरच टक्केवारीवर चर्चा; आ. आसगावकरांकडून शिक्षण विभागाचे अधिकारी धारेवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय बिलासह वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तसेच अन्य कामांसाठी माध्यमिक शिक्षण विभागात चालणार्‍या टक्केवारीची जाहीर चर्चा गुरुवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्यासमोरच त्यांच्या दालनात झाली. वैद्यकीय बिलासाठी आपण दोन टक्के रक्कम दिल्याचे सांगताच त्यावर सारवासारव करताना माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना चांगलीच कसरत करावी लागली.

निमित्त होते माध्यमिक शिक्षण विभागातील तक्रारींवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बेठकीचे. या बैठकीत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरत हे प्रकार थांबले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम दिला. जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागामधील कर्मचार्‍याची शाहूवाडीतील शिक्षण संस्थेतील एका क्लार्कसोबत वैद्यकीय बिलाच्या टक्केवारीवरून बुधवारी वादावादी झाली होती. हा प्रकार संबंधित क्लार्कने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना सांगितला. त्यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारी दुपारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात बैठक बोलाविली. बैठकीस माजी आमदार भगवानराव साळुंखेदेखील उपस्थित होते.

तासभर चाललेल्या या बैठकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपल्या तक्रारी मांडल्यानंतर बुधवारी घडलेल्या घटनेची चर्चा सुरू झाली. यावेळी शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या क्लार्कने वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी आपण दोन टक्के रक्कम संबंधित कर्मचार्‍याला दिल्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. आंबोकर यांच्या समोरच सांगितले. त्याचे रेकॉर्डिंगही असल्याचे त्यांनी सांगितले. यावर माध्यमिक शिक्षण विभागातील संबंधित कर्मचार्‍याने आपण ही रक्कम घेतली नाही, ती टेबलमध्ये तशीच ठेवली असल्याचे सांगितले. यावरून संबंधित कर्मचार्‍यांची बदली करून त्याची चौकशी करण्याची मागणी उपस्थितांनी केल्यामुळे बैठकीत गोंधळ झाला. यावर खुलासा करताना मात्र डॉ. आंबोकर यांची चांगलीच अडचण झाली.

यावेळी शिक्षण विभागातील एजंटगिरी थांबवावी, फायलींचा वेळेत निपटारा करावा, पैशाची मागणी करणार्‍या कर्मचाार्‍यांना तेथून बदला. त्यांना अधिकार्‍यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही असा इशारादेखील आ. आसगावकर यांनी दिला. दहा दिवसांमध्ये यावर कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचार्‍यांमुळे शिक्षणाधिकार्‍यांची बदनामी

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर यांचे काम चांगले आहे; परंतु त्यांच्या विभागात तळ ठोकून बसलेले आणि टक्केवारीला सोकावलेल्या कर्मचार्‍यांमुळे त्यांची बदनामी होत असल्याचे एका शिक्षकाने सांगितले.

Back to top button