प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री?; पंतप्रधानांनी ट्विट केला फोटो

प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री?; पंतप्रधानांनी ट्विट केला फोटो
Published on
Updated on

नवी दिल्ली/पणजी; पुढारी ऑनलाईन

डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींनी सावंत यांना मुख्यमंत्रीपदासाठी हिरवा झेंडा दाखवला असून ते होळी सणानंतर मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे समजते. त्याचबरोबर मणिपूरमध्ये विद्यमान मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, गोव्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी डॉ. प्रमोद सावंत आणि गोव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीचे फोटो ट्विटवरुन शेअर केले आहेत. "आम्हाला पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल भाजप गोव्यातील जनतेचा आभारी आहे. आगामी काळात गोव्याच्या प्रगतीसाठी आम्ही कार्य करत राहू." असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या कामाची जाहीर स्तुती केली आहे. प्रदेश पातळीवरील नेतृत्व ठरविण्यात त्यांचा शब्द अंतिम असल्याने डॉ. सावंत यांच्या नावाची घोषणा करण्याची केवळ औपचारिकता राहिली आहे. भाजपने अद्याप सत्ता स्थापनेसाठी दावा न केल्याने नेतृत्वाबाबत भाजपमध्ये पेच निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व पंचायतमंत्री माविन गुदिन्होंची नावे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पुढे आली असली तरी डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. बहुमताला केवळ एक आमदार कमी पडला तरी तीन अपक्षांनी पाठिंबा दिल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सावंत यांच्याबाबतीत फेरविचार कशाला करावा, असे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे.

गोव्यात सरकार स्थापनेसाठीची तयारी सुरू….

भाजपने गोव्यात ४० पैकी २० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने विधिमंडळ गटनेता न निवडल्याने मुख्यमंत्रिपदाचा व सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. येत्या रविवारी, २० किंवा सोमवारी, २१ रोजी हा शपथविधी कांपालच्या मैदानावर करण्याचे नियोजन आहे. सरकार स्थापनेसाठीची तयारी मात्र सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी आठवी विधानसभा अस्तित्वात आणण्यात आली. सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी सोमवारी राज्यपालांकडून आमदारकीची शपथ घेतली होती. त्यांनी ३९ जणांना मंगळवारी आमदारकीची शपथ दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news