

पणजी: पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणूक आणि निकाल याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि संघटन सचिव सतीश धोंड दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज, बुधवारी सकाळी 11 वाजता सादरीकरण करतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावल्याने मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावावर या बैठकीत मोहोर उमटेल, असे संकेत मिळाले आहेत.
भाजपने 40 पैकी 20 जागांवर विजय मिळविल्यानंतर निवडणुकीतील समग्र कामगिरीविषयी सादरीकरण असेल. त्यासाठी हे तिन्ही नेते विधानसभा अधिवेशनानंतर सोमवारी दुपारनंतर दिल्लीत पोहोचले आहेत. पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटीही त्यांनी घेतल्या आहेत. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात गणेश गावकर यांचे नाव विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी पुकारून झाली. त्यांनी 'माननीय सदस्य गणेश गावकर' असा पुकारा केला. त्यामुळे विधानसभेसाठी हंगामी सभापती नेमला नाही, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
विधानसभेत 19 नवे चेहरे दाखल झाल्याने ते थोडेसे भांबावले होते. माविन आणि काब्राल यांच्यासोबत मुख्यमंत्री
हास्यविनोदात रमले होते. भाजपने अद्याप सत्ता स्थापनेसाठी दावा न केल्याने नेतृत्वाबाबत भाजपमध्ये पेच निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पंचायतमंत्री माविन गुदिन्होंची नावे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पुढे आली असली तरी डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. बहुमताला केवळ एक आमदार कमी पडला तरी तीन अपक्षांनी पाठिंबा दिल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सावंत यांच्याबाबतीत फेरविचार कशाला करावा, असे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या कामाची जाहीर स्तुती केली आहे. प्रदेश पातळीवरील नेतृत्व ठरविण्यात त्यांचा शब्द अंतिम असल्याने डॉ. सावंत यांच्या नावाची घोेषणा करण्याची औपचारिकता येत्या दोन-तीन दिवसांत पार पाडली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपने विधिमंडळ गटनेता न निवडल्याने मुख्यमंत्रिपदाचा व सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. येत्या रविवारी, 20 किंवा सोमवारी, 21 रोजी हा शपथविधी कांपालच्या मैदानावर करण्याचे नियोजन आहे. सरकार स्थापनेसाठीची तयारी मात्र सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी आठवी विधानसभा अस्तित्वात आणण्यात आली. सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी सोमवारी राज्यपालांकडून आमदारकीची शपथ घेतली होती. त्यांनी 39 जणांना मंगळवारी आमदारकीची शपथ दिली.
हिमाचल प्रदेशातील राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राज्यातील नेतृत्वाचा प्रश्न निकाली निघाल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात आर्लेकर यांच्याशी दै. 'पुढारी'ने संवाद साधला. दिल्लीवारीबाबत त्यांनी सांगितले, हिमाचल प्रदेश सरकारची काही कामे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे होती. त्यासाठी सोमवारी त्यांची भेट घेतली. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही भेटलो. नड्डा यांना बरेच दिवस भेटलो नव्हतो आणि अमित शहा यांच्या भेटीची वेळ मिळाली आणि त्यांनाही भेटलो. या भेटी केवळ कामानिमित्ताने आणि सदिच्छा स्वरूपाच्या आहेत. याचा कोणताही राजकीय अर्थ कृपया काढला जाऊ नये, असे आर्लेकर यांनी सांगितले.