Diwali Muhurat Trading 2022 | मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार मालामाल, २.१ लाख कोटींचा फायदा, ‘हे’ शेअर्स ठरले टॉप गेनर्स

Diwali Muhurat Trading 2022 | मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार मालामाल, २.१ लाख कोटींचा फायदा, ‘हे’ शेअर्स ठरले टॉप गेनर्स

Diwali Muhurat Trading 2022 : दिवाळीच्या दिवसापासून हिंदू संवत वर्ष २०७९ ची सुरुवात होते. हिंदू संवतच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिवाळी दिवशी सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) एक तासांचे मुहूर्ताचे ट्रेडिंग सत्र पार पडले. सोमवारी लक्ष्मीपूजनला झालेल्या एक तासाच्या विशेष 'मुहूर्त' ट्रेडिंग सत्रात भारतीय इक्विटी निर्देशांक ‍वधारले होते. बीएसई आणि एनएसईवर संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान ट्रेडिंग झाले. या सत्रात सेन्सेक्स ५२५ अंकांनी म्हणजेच ०.८८ टक्क्यांनी वाढून ५९,८३२ वर बंद झाला, तर निफ्टी १५४ अंकांनी म्हणजेच ०.८८ टक्क्यांनी वाढून १७,७३१ वर स्थिरावला. विशेष एक तासाच्या ट्रेडिंग सत्रानंतर गुंतवणूकदारांना २.१ लाख कोटींचा फायदा झाला.

निफ्टी मिडकॅप ०.५० टक्‍क्‍यांनी व स्‍मॉलकॅप ०.९३ टक्‍क्‍यांनी वाढल्याने मिड-आणि स्‍माल-कॅप समभागांनी उच्चांक गाठला. बीएसईवर २,६५९ शेअर्स ‍वधारले तर ७४७ शेअर्समध्ये घसरण झाली. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (m-cap) वाढून २७६.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आयसीआयसीआय बँक, नेस्ले आदींचे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. (Stock Market) आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वधारले. आयसीआयसीआयचे शेअर्स २.८८ टक्क्यांनी वाढून ९३३.२५ रुपयांवर बंद झाले. नेस्ले इंडिया, एसबीआय, एल अँड टी आणि एचडीएफसी हे देखील टॉप गेनर्स ठरले.

लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांना समभागांमध्ये व्यवहार करण्याची संधी मिळावी यादृष्टीने गुंतवणूकदारांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली जाते. या दिवशी बहुतांश गुंतवणूकदार दुरच्या अवधीच्या (लाँगटर्म) हिशोबाने चांगल्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी करतात. तसेच काही समभागांच्या गुंतवणुकीमध्ये नफा असल्यास ट्रेडिंगच्या दरम्यान नफ्यातील काही भागाची विक्री करून लक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात नफा घरी आणतात.

दरवर्षी दिवाळीत लक्ष्मी पूजनानिमित्तच्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांकडून चौफेर खरेदी केली जाते. बीएसईवर १९५७ मध्ये आणि एनएसईवर १९९२ मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. (Diwali Muhurat Trading 2022)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news