Diwali 2023 : आनंददायी, चैतन्य वाढवणारी दिवाळी गुरूवारपासून: ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुहूर्त

Diwali 2023 : आनंददायी, चैतन्य वाढवणारी दिवाळी गुरूवारपासून: ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुहूर्त
Published on
Updated on


पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते, अशी ही आनंददायी, उत्साही, चैतन्य वाढवणारी दिवाळी गुरूवारपासून (दि.९) सुरू होत आहे. (Diwali 2023)

यंदाची दिवाळी गुरूवारपासून सुरू होत आहे. वसूबारस ९ नोव्हेंबररोजी गुरुवारी आहे. धनत्रयोदशी १० नोव्हेंबररोजी शुक्रवारी आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबररोजी रविवारी एकाच दिवशी आलेले आहे. मध्ये एक दिवस सोडून १४ नोव्हेंबररोजी मंगळवारी दिवाळी पाडवा आणि दुसर्‍या दिवशी १५ नोव्हेंबररोजी बुधवारी भाऊबीज आहे.

वसूबारस

या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.

ततः सर्वमये देवी सर्व देवैरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ॥
(अर्थ : हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.)

धनत्रयोदशी, यमदीपदान

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते.

Diwali 2023 : नरक चतुर्दशी

नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधिकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणार्‍या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते.

लक्ष्मीकुबेर पूजन

शेतकर्‍यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे. अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ॥
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

लक्ष्मीपूजन मुहूर्त

रविवारी (दि.१२) दुपारी १.४५ ते ३.१०, सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे, म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.

वहीपूजन मुहूर्त

मंगळवारी (दि.१४) पहाटे २.३० ते ५.३०, सकाळी ६. ४५ ते ७.३५, सकाळी १०.५५ ते दुपारी १.४५

यमद्वितीया (भाऊबीज)

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे पुराणात सांगितले आहे.

दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news