पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण प्रवेशासाठी प्रवेश घेतला आहे. परंतु, शैक्षणिक कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाने आज (दि. 13) कागदपत्रे जमा करण्यासाठी शेवटची संधी दिली आहे; अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांना कॅपमधील प्रवेशच रद्द केला जाणार असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता दहावीनंतरचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम, बारावीनंतरचे औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान पदविका आणि बारावी, आयटीआयनंतरचे थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या पदविका अभ्यासक्रमांच्या महाराष्ट्र राज्यातील संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना, संस्थेत प्रवेश घेताना आवश्यक ते नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना संबंधित प्राधिकरणाकडे केलेल्या अर्जाच्या पावतीसह हमीपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली होती.
तसेच दिलेल्या कालावधीत उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत देखील कळविण्यात आले होते. त्यानुसार बर्याच उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे संस्थेकडे सादर केलेली आहेत. सर्व पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेर्या पूर्ण झालेल्या आहेत. संस्थांनी उमेदवारांना वारंवार सूचना देऊनसुध्दा काही उमेदवारांनी मूळ कागदपत्रे अद्यापही संबंधित संस्थेकडे सादर केलेली नाहीत, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. ज्या उमेवारांनी अद्याप ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा उमेदवारांना कागदपत्रे प्रवेशित संस्थेत सादर करण्यास आज (दि. 13) सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे.
दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी संस्थेस मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवारांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे झालेला प्रवेश रद्द होईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच अशा प्रकारे प्रवेश रद्द झालेले विद्यार्थी संस्थास्तरावर प्रवेशास पात्र राहतील, असा इशारा तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिला आहे.
हेही वाचा