पुढारी ऑनलाईन डेस्क : वयस्क व्यक्तींच्या आयुष्यात अस्तित्त्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा, असे वाटू लागते. 'आता वेळ झाली' या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित असून हा चित्रपट यंदाच्या हिवाळ्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सध्याच्या स्थितीत मानवी मुल्ये जपणाऱ्या कोणाच्याही मनात द्विधा परिस्थिती निर्माण करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन या पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने केले असून सोबतीला भक्कम अशी कलाकारांची फळी आहे.
दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोलकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. त्याची निर्मिती दिनेश बन्सल (इमॅजीन एंटरटेन्मेट अँड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड)ची आहे.
हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवणारी, काहीशी गमतीदार आणि तरीही भावनात्मक आहे. दोन जीवांची ही कथा प्रेरक साहसी आहे आणि तरीही ती अस्तित्वाबद्दल चक्रावून टाकणारे प्रश्न निर्माण करणारीसुद्धा आहे. अनंत महादेवन (अनंत महादेवन फिल्म्स), जी के अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयवंत वाडकर, अभिनव पाटेकर हे इतर कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
"मला नेहमीच अस्सल चित्रपट बनवायचा होता. असा चित्रपट की, जो सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असेल आणि वास्तववादी असेल. 'आता वेळ झाली'चा विषय मला प्रत्येक पिढीला खिळवून ठेवेल. तसेच आयुष्याबद्दल व अस्तित्त्वाबद्दल पुनर्विचार करायला लावेल, असा वाटला. हा विषय असा आहे की, त्यावर याआधी चर्चा झालेली नाही. त्यामुळेच सुरुवात करण्यासाठी मला हा एक आदर्श चित्रपट वाटला," असे उद्गार निर्माते दिनेश बन्सल यांनी काढले.
'आता वेळ झाली' हा आत्तापर्यंत कित्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवडला गेला आहे. डल्लास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण फिल्म फेस्टिव्हल यांचा त्यात समावेश आहे.