उन्हाळ्यातील कडक ऊन आणि उष्ण झळांचा आपल्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे या ऋतूमध्ये स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. खास करून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ( Diet for Summer Season )
उन्हाळ्यामध्ये आपण स्वतःकडे विशेष लक्ष दिले नाही तर, तर्हेतर्हेच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अधिक उन्हामुळे शरीरातून अत्याधिक प्रमाणात घाम निघाल्यामुळे डीहायड्रेशनची समस्या निर्माण होतेच; पण दुसरीकडे अस्वच्छता हे देखील अनेक आजारांचे कारण बनते. अशा स्थितीत खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले तर, शरीर अशक्त होण्याची आणि आजारी पडण्याची शक्यता बरीच कमी होईल. म्हणूनच या ऋतूमध्ये आपल्या आहाराबाबत काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
या ऋतूत शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून कोणते पेय पदार्थ घ्यावेत आणि कोणते घेऊ नयेत हे जाणून घ्यावे. या ऋतूत पोटात गॅस निर्माण करणारे पेय पदार्थ घेऊ नयेत. खासकरून चहाचे सेवन अगदी कमी करावे. शक्य असेल तर चहा सोडूनच द्यावा किंवा दोन कपांपेक्षा जास्त घेऊ नये. कारण तो आपली पचनक्रिया बिघडवतो.
या ऋतूमध्ये नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर असते. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्धही असते. या दिवसात चणे देखील आहारात प्रामुख्याने सामील करावेत. काळे आणि हिरवे चणे अधिक प्रमाणात खावेत; कारण याचा परिणाम थंड असतो. यामुळे पोट जड होत नाही आणि भूकही शांत होते.
मोसमी फळे म्हणजे कलिंगड, टरबूज, खरबूज इत्यादी या दिवसात खूपच फायदेशीर असतात. पित्ताची समस्या असेल तर काकडीचा आणि दुधीभोपळ्याचा रस एकत्र प्रमाणात मिसळून त्यामध्ये सैंधव मीठ टाकून किंवा लवण भास्कर आयुर्वेदिक चुर्ण टाकून तो प्यावा. यामुळे गॅस नियंत्रित राहातो आणि पचनक्षमता उत्तम बनते. सॅलेड आणि चाटमध्ये देखील साध्या मीठाऐवजी याचाच वापर करावा. उन्हाळा हा ऋतू म्हटला म्हणजे आंबे आलेच. मात्र आंबे खाण्याबाबत थोडी सावधगिरी बाळगावी. आंबे खाण्यापूर्वी दोन तास आधी ते पाण्यात ठेवावे आणि मगच ते खावे. यामुळे उष्णता बाधत नाही.
उन्हाळ्यामध्ये हिरव्या चटण्यांचे सेवन करावे. म्हणजे कोथिंबीर, पुदिना, आवळा, कांदा इत्यादीची चटणी बनवून जेवणासोबत घ्यावी. यामुळे भोजनाचा स्वादही वाढतो आणि आहार ऋतूनुरूपही बनतो. नोकरदार व्यक्तींनी रिकाम्यापोटी घराबाहेर मुळीच पडू नये. त्यामुळे उष्माघाताची शक्यता वाढते. नोकरदार महिलांनी दुपारच्या जेवणात अधिक प्रमाणात सॅलेड घेतल्यास फायदा होतो. घरातून बाहेर पडताना न्याहारी करूनच बाहेर पडावे.
या दिवसात मांसाहार अगदी कमी करावा. मद्यसेवनही करू नये. कारण हे पदार्थ उष्णता वाढवणारे आहेत. शिवाय हे पदार्थ पचण्यासाठी शरीराला भरपूर मेहनत करावी लागते. साधा, कमी तिखट, शाकाहार घेणे या दिवसात सर्वात उत्तम ठरते. उन्हाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. मुलांना पचायला हलके असे पदार्थ खायला द्यावेत. नुडल्स, पिझ्झा यासारख्या पचायला जड असणार्या पदार्थांपासून त्यांना दूर ठेवावे. तसेच आंबवलेेले पदार्थही या दिवसात देऊ नयेत. लिंबू पाणी नियमितपणे द्यावे.
या ऋतूमध्ये सकाळची न्याहारी अत्यंत गरजेची असते. त्यामुळे ती चुकवू नये. न्याहारीमध्ये पातळ पदार्थ अवश्य घ्यावेत. नारळपाणी, फळे अथवा फळांचा रस इत्यादी प्रामुख्याने सामील करावेत. पोहे, उप्पीट असे हलके पदार्थ देखील न्याहारीसाठी चालू शकतात.
दुपारी जास्त भूक नसल्यास काळ्या चण्यांचे चाट बनवून खावे. हा पदार्थ घरीच बनविणे उत्तम. हिरव्या चण्याचे चाटही खाता येऊ शकते. भूक जास्त असेल तर पोळीभाजी, कोशिंबिरी, लस्सी, ताक आणि हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश करावा. दह्याचा वापर अनेक प्रकारे करता येऊ शकतो. तो अवश्य करावा.
या दिवसात कोबी कमी प्रमाणात खावा. कारण ती या ऋतूतील भाजी नाही. या ऋतूतील भाज्यांमध्ये बीन्स, पालक, वालपापडी, वांगी इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे या भाज्या खाव्यात. तसेच दुधीभोपळा देखील वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाता येतो. तो देखील या ऋतूत पचायला हलका असतो.
संध्याकाळची न्याहारी : संध्याकाळच्या वेळी चुरमुरे, भेळपुरी असे काहीसे खावे. कधीकधी सॅलेड खावे. सरबत, थंडाई इत्यादी पेय घ्यावीत. खस, गुलाब अशी गारवा देणारी सरबते घ्यावीत. लिंबूपाणी आणि ताक हे तर केव्हाही फायदेशीर ठरतात.
रात्रीचे जेवण : रात्रीचे जेवण या दिवसात अतिशय हलके ठेवावे. यावेळी सॅलेड आणि भाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. पोळी खाणार असाल तर दुपारच्या जेवणापेक्षा एक पोळी कमी खावी. उन्हाळ्यामध्ये दुधाची गरज नसते. पण झोपेची तक्रार असेल तर दूध प्यायला हरकत नाही. मात्र, त्याचे प्रमाण कमी असावे आणि त्यामध्ये वेलची पूड टाकावी. रात्रीच्या वेळी चहा, कॉफीचे सेवन अजिबात करू नये.
या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये गुलकंद, सब्जा यासारखे पदार्थ अवश्य खावेत. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते. रात्री झोपताना तळपायांना साजूक तूप लावून काशाची वाटी घेऊन ती तळपायांना घासावी. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.
तसेच शक्यतो उन्हात बाहेर पडू नये. पडायचेच असल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ, डोळ्यावर गॉगल्स अवश्य असावेत. शक्य असल्यास डोक्यावर वाळ्याची टोपी घालावी. उन्हातून आल्यानंतर आधी दहा ते पंधरा मिनिटे शांतपणे बसावे. एकदम एसीमध्ये जाऊ नये. कारण विरुद्ध तापमानामुळे त्रास होण्याची शक्यता असते. अशा छोट्यामोठ्या गोष्टी लक्षात घेऊन उन्हाळ्याचा सामना केला तर नकोसा वाटणारा उन्हाळा बर्याच प्रमाणात सुसाह्य ठरू शकतो.
डॉ. संतोष काळे
हेही वाचा :