धुळे : पुढारी वृत्तसेवा ; सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 91 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हाभरात नाकाबंदी राबवली. या अंतर्गत तब्बल 328 कारवाया करण्यात आल्या असून यातून 12 लाख 54 हजार 235 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमध्ये सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या सात पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या नावाखाली जिल्ह्यात बेकायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांनी नाकाबंदी राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. या अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी पॉईंट लावून तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह 36 पोलीस अधिकारी तसेच 178 पोलीस अंमलदारांना जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. याच अंतर्गत मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्या 91 जणांवर तसेच मोटार वाहन कायद्यान्वये वेगवेगळे नियम तोडणाऱ्या 117 जणां कडून 49 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दारूबंदी कायद्यान्वये जिल्ह्यात 99 ठिकाणी कारवाई करण्यात आल्या असून एक लाख 61 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार प्रतिबंध कायद्यान्वये 19 ठिकाणी कारवाई केली असून यात 11 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनगीर पोलीस ठाणे अंतर्गत महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेल्या गुटखा जप्त करण्यात आला असून यात दोन लाख 24 हजार 640 रुपयांच्या सुपारी सह आठ लाखाची आयशर जप्त करण्यात आली आहे. विशेषतः शिरपूर शहर पोलिसांनी एका आरोपीकडून दोन गावठी पिस्टल तसेच पाच जिवंत काढतोस जप्त केले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 328 कायदेशीर कारवाया करून एकूण बारा लाख 54 हजार 235 रुपयाची दंडाची रक्कम व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, यापुढे देखील आगामी निवडणुका, सण, उत्सव या अनुषंगाने वेळोवेळी नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन व ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येऊन कायद्याच्या विरोधात काम करणाऱ्या विरोधात प्रभावी कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सात अंमलदार निलंबित
धुळे जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तसेच प्राणांकित अपघात व इतर अपघातांना हाणा घालण्याकरता सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्य प्राशन करून वाहन चालवणे, मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. तसेच सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले होते. यादरम्यान धुळे जिल्हा पोलीस दलातील दंगा काबू पथकातील काही पोलिस अंमलदार या अति महत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असल्याचे आढळून आले. व काही अंमलदारांना वरिष्ठांनी बिनतारी संदेशाद्वारे कॉल दिला असता त्यांनी हा संदेश सोडून कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत पणे कर्तव्यावर गैरजर असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक धिवरे यांनी अति महत्त्वाच्या व संवर्धनशील बंदोबस्त कामे गैरहजर मिळून आलेल्या या सात अंमलदारांना सेवेतून निलंबित केले असून त्यांच्यावर शिस्तभंग विषयी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित केलेल्या अंमलदारांमध्ये धुळे नियंत्रण कक्षाचे पोलीस हवालदार महेंद्र ठाकूर ,मोटार परिवहन विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भामरे, तसेच साक्री येथील दंगा काबू पथकातील पोलीस शिपाई प्रदीप ठाकरे, राकेश बोरसे, हवालदार मुक्ता वळवी ,पोलीस शिपाई विनोद गांगुर्डे,व पोलीस शिपाई किशोर पारधी यांचा समावेश आहे.
हेही वाचा :