धुळ्यात पोलीस उपनिरीक्षकावर भर दिवसा चाकू हल्ला

धुळ्यात पोलीस उपनिरीक्षकावर भर दिवसा चाकू हल्ला

धुळे, पुढारी वृत्तसेवा : महामार्ग सुरक्षा पथकातील उपनिरीक्षकावर चाकूहल्ला झाल्याचा प्रकार आज धुळ्यात घडला आहे. गंभीर जखमी अवस्थेत या उपनिरीक्षकाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून हल्लेखोर युवकाच्या शोधासाठी तयार केलेल्या पोलिस पथकाने एका संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. (Dhule)

धुळे शहरातील मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांची नुकतीच महामार्ग सुरक्षा पथकात बदली झाली होती. आज दुपारी ते त्यांच्या दुचाकीने धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळील श्रीराम पेट्रोल पंपाजवळून जात असताना समोरून येणार्‍या एका दुचाकीस्वाराने त्यांना हुलकावणी दिली. दुचाकीवरील युवकाने साध्या वेशात असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मिर्झा यांच्याबरोबर वाद घातला. यानंतर काही वेळातच त्याने धारदार चाकू काढून मिर्झा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. (Dhule)

हल्लेखोर युवक हा घटनास्थळावर असताना त्याला काही लोकांनी जखमी व्यक्ती हा पोलीस दलाचा अधिकारी असल्याचे सांगितल्याने हल्लेखोर युवकाने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली. तातडीने धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी उपनिरीक्षक मिर्झा यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी पथकाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सुरू केली असून एका संशयित युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. (Dhule)

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news