कराड : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असून, तेच राज्य शासनाच्या कामकाजाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करतात. राज्यसभेचे मतदान ओपन पद्धतीने करावे लागते आणि त्यानंतरही भाजपाच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे, हे लक्षात घ्या. आता विधान परिषद निवडणुकीला गुप्त मतदान पद्धत वापरली जाते असे सांगत राज्यसभा सिर्फ झाकी है… विधानपरिषद अभी बाकी है ,असे सांगत नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धनंजय महाडीक यांनी महाविकास आघाडीला इशाराच दिला.
राज्यसभा निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ होते. त्यामुळेच माझी उमेदवारी जाहीर झाली होती. आता महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून घोडेबाजार केल्याचा आरोप केला जात आहे. संख्याबळ पुरेसे असल्याने भाजपाकडून घोडेबाजार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. असेही ते म्हणाले आहे.
संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजला आहे. या निवडणुकीत 3 जूनला अर्ज माघारी घ्यावा लागेल असे वाटले होते. मात्र निवडणूक लागली आणि मतमोजणीवेळी वाट पहावी लागली. राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीसह शिवसेना महाराष्ट्रात 2019 ला एकत्र आली असली तरी कोल्हापूरमध्ये पूर्वीपासून हे तिन्ही पक्ष महाडीक कुटूंबाविरूद्ध एकत्र आहेत. भाजपाचा कोल्हापूर जिल्ह्यात आमदार – खासदार नाही. जिल्हा परिषद आमची सत्ता होती, ती आता नाही. कोल्हापूर महापालिकेत सत्ता नाही आणि म्हणूनच ही सर्व सत्तास्थाने पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे धनंजय महाडीक यांनी सांगितले.कोल्हापूरसह तीन-चार जिल्ह्यात महाडीक कुटूंबाचा दबदबा होता, आहे आणि पुढील 100 वर्ष तो कायम राहणार आहे असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
हे ही वाचलंत का?