आमचं सरकार फेस टू फेस, फेसबुकवर नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आमचं सरकार फेस टू फेस, फेसबुकवर नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Published on
Updated on

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महायुतीचे सरकार हे बंद दाराआड काम करणारे नाही. फेस टू फेस असून फेसबुकवर बोलणारं नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. दुर्दैवाने दुबार पेरणीचे संकट आले तर सरकार वार्‍यावर सोडणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी हे सरकार जनतेचे असल्याचे स्पष्ट केले.
शिर्डी येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे, आ. किरण लहामटे, आ. प्रा. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. सत्यजीत तांबे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे सरकार व प्रशासन 'मिशन' मोडवर काम करीत असून 36 जिल्ह्यातील 365 दिवस लोकांच्या दारापर्यंत सरकार जाणार आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा उठतो आहे. शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून कदाचित नगर हा पहिला जिल्हा सौर ऊर्जा राबविण्यात आघाडी घेणारा असेल असेही फडणीस म्हणाले. आमची नजर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असल्याचे विरोधक बोलतात, त्याचा संदर्भ घेत फडणवीस म्हणाले, होय, आमचा डोळा आहे, मात्र तो संरक्षणासाठी आहे. कोणीही त्याकडे वाकड्या नजरेने पाहू नये यासाठी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ङ्गमी पुन्हा येईल, याची अजूनही दहशत असल्याचे सांगतानाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत त्यांनाही चिमटा काढला.

मी पुन्हा आलो होतो, पण काहींनी बेईमानी केली, ज्यांनी केली, त्यांचा पक्षच घेवून आलो. पंतप्रधान मोदीच पुढच्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करतील, विरोधकांच्या खिचडीने पोट भरणार नाही. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, त्यांना बोलू द्या, आम्ही काम करत राहू, पारदर्शी व प्रामाणिकतेने काम करू अशी ग्वाही फडणीस यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रारंभी पावसाने ओढ दिल्यामुळे 'राज्यात लवकर पाऊस पडू दे', अशी प्रार्थना साईचरणी करुन बाबांनी बळ दिल्यामुळेच 'शासन आपल्या दारी' अशा कार्यक्रमातून जनतेची सेवा करीत असल्याचे नम्रपणे सांगितले. समृद्धी महामार्गासह त्यावरील 13 कृषी समृद्धी केंद्र उभरण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचा विकास हाच आमचा 'अजेंडा' असून त्यासाठी महायुतीचे सरकार जीवाचे रान करीत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले ट्रीपल इंजीनमुळे अधीक गती मिळाली आहे. सरकारने एक रुपयात पीक विमा योजना आणल्याने पाचपट शेतकर्‍यांचा सहभाग वाढला आहे. लम्पी आजारावर गेल्यावेळी शासनाने 100 कोटींची मदत दिली. यापुढे काळजी घेत आहे. 'सबका साथ सबका विकास' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीद वाक्य घेवून राबवीत असलेली देशातील 'हर घर जल' योजना व मुख्यमंत्री रोजगार योजना अशा सर्व योजनांमध्ये राज्य अव्वल असून सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहचविणार आहे.

  • जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांनी प्रास्तावीक केले. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.
  • मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधीक स्वरुपात 25 लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार विरोधकांना कामातून उत्तर देणारे आहे. यापूर्वी विरोधक आमचे सरकार पडणार…पडणार असे म्हणायचे. आता अजितदादा आमच्या सरकारमध्ये आल्याने हे सरकार अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे आता हे माझे मुख्यमंत्रिपद जाणार म्हणतात. परंतु कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचे शिंदे म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news