नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाचा नवीन व्हेरियंट भारतात वेगाने पसरत आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी एकाच दिवशी १० ओमायक्रॉन बाधित आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. दिल्लीत एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या त्यामुळे २० पर्यंत पोहचली आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट ११ राज्यांमध्ये पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. (Delhi Omicron Cases)
महाराष्ट्रात सर्वाधित ३२ ओमायक्रॉनबाधित आहेत. दिल्लीत आढळलेल्या नवीन रूग्णांनंतर देशातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ९८ पर्यंत पोहचली आहे.
दिल्लीतील २० रूग्णांपैकी १० रूग्णांना रूग्णालयात सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनूसार अवघ्या तीन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंट आफ्रिका तसेच यूरोपमध्ये वेगाने पसरला आहे.
अशात भारतातही जानेवारीपर्यंत रूग्णांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोना महारोगराईच्या तिसऱ्या लाटेचे कारण ठरू शकते, अशी भीती वर्तवली जात आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ ओमायक्रॉनबाधित आहेत.
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली २०, कर्नाटक ८,तेलंगणा ७, केरळ आणि गुजरात ५ आणि आंधप्रदेश, तामिळनाडू, चंदीगढ तसेच पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १ ओमायक्रॉन बाधितांवर उपचार सुरू आहे.