पुढारी ऑनलाईन: दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २ जूनपर्यंत वाढ केली आहे. अबकारी धोरण घोटाळा प्रकरणातील सीबीआय न्यायालयीन कोठडी आज (दि.१२) संपल्यानंतर सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात आणण्यात आले. दरम्यान कोर्टाने सिसोदिया यांच्यावरील प्रलंबित आरोपपत्राचा विचार करता, सिसोदिया यांची कोठडी वाढवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. कोर्टाच्या या निर्णयाने मनीष सिसोदिया यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. त्यामुळे सिसोदिया यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी धोरण घोटाळ्यातील ईडी प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ मे पर्यंत वाढ केली आहे. सोमवारी ८ मे रोजी सिसोदिया यांची ईडी प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पुन्हा मनीष सिसोदिया यांची ईडी प्रकरणातील न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली.
मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती आणि मनीष सिसोदिया सध्या ईडी तसेच सीबीआयच्या खटल्यात न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत.