पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल
(Sunita Kejriwal ) यांना दिल्लीतील न्यायालयाने समन्स बजावले आहे. सुनीता केजरीवाल यांच्या नावे दाेन मतदान ओळखपत्र असल्याची तक्रार भाजप नेत्याने केली होती. लोकप्रतिनिधी कायदाच्या तरतुदींचे उल्लंघन प्रकरणी सुनीता केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे.
या प्रकरणी दिल्ली भाजपचे नेते हरीश खुराना यांनी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तक्रारदार आणि इतर साक्षीदारांच्या साक्षीचा विचार केल्यानंतर सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal ) यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला चालवला जावा. लोकप्रतिनिधी कायदा, १९५९ च्या कलम ३१ अन्वये शिक्षापात्र गुन्हा केल्याबद्दल समन्स बजावण्यात यावे, असा आदेश २९ ऑगस्ट रोजी महानगर दंडाधिकारी अरजिंदर कौर यांनी दिला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.
भाजप नेते हरीश खुराना यांनी २०१९ मध्ये सुनीता केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. साहिबााबाद (गाझियाबाद मतदारसंघ) आणि दिल्लीतील चांदनी चौक या मतदार यादीत त्यांचे मतदार म्हणून नोंद आहे. एका व्यक्तीचे दोन मतदारसंघांमध्ये मतदार म्हणून नाव असणे हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १७ चे उल्लंघन करते, असे खुराना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.
हेही वाचा :