पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या इतिहासाची काल पुररावृत्ती झाली. पुन्हा एकदा तळाला गेलेल्या संघाने आपला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरणा-या संघाचा पत्ता कट केला. काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मधून दिल्ली कॅपिटल्सला बाहेरचा रस्ता दाखवला आणि चार वर्षांपूर्वीचा बदला घेत हिशोब चुकता केला. आयपीएलमध्ये बरोबर चार हंगामापूर्वी असे घडले होते, पण त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला स्पर्धेतून बाहेर काढले होते.
IPL 2022 च्या शेवटून दुस-या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. अशा परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीचा संघ नशिबवान ठरला आणि आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. दिल्लीला हरवून मुंबईने आयपीएल 2018 चा बदला घेतला, तेव्हा नेमका असाच प्रकार मुंबईच्या बाबतीत घडला होता. जो यंदा दिल्लीच्या बाबतीत घडला आहे.
आयपीएल 2018 च्या शेवटून दुस-या सामन्यात मुंबई आणि दिल्लीचाच सामना झाला होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर होता. तर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार होता. मात्र, त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या होम ग्राऊंडवर मुंबई इंडियन्सचा 11 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे मुंबई त्यावर्षी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. पण पुढच्या चारच वर्षात आयपीएलमध्ये घडून गेलेल्या त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. काळाने मुंबईला आपला बदला चूकता करण्यासाठी एक संधी दिली. मुंबईनेही यंदा कंबर कसून 2018 मध्ये दिल्लीकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला आणि यंदाच्या हंगामात दिल्लीसाठी आयपीएलच्या प्लेऑफचे दरवाजे बंद केले.