दत्त जयंती : श्री क्षेत्र नृसिंहवाडी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

दत्त जयंती : श्री क्षेत्र नृसिंहवाडी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
Published on
Updated on

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे आज (शनिवारी) दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराजांच्या कायम वास्तव्याने भारलेला प्रदेश. भेटीलागी माझे मन उतावीळ, कधी मी पाऊले पाहीन डोळा। अशी मनाची स्थिती कायम होत असते. जाताना गाडीच्याही आधी नृसिंहवाडीला पोहोचलेले मन हे तिथून येताना आपण वाहनात बसलो, तरी महाराजांच्या मंडपातच असते. वाडी प्रवासात कायम कोणीतरी सोबत असावे असेही नाही. कधी मनाला आलेली ग्लानी झटकण्यासाठी तर कधी तिथी किंवा उत्सवाच्या निमित्ताने, नृसिंहवाडीला जाणे म्हणजे एक आनंदयात्रा असते.

वास्तविक नृसिंहवाडी आणि आपण यांना जोडणारा दुवा एकच दत्त महाराज! इतरवेळी प्रवासाला लागणारे तयारी, आरक्षण हे भाग नृसिंहवाडीला जाताना कुठेही नसतात. एखादी पिशवी आणि चार कपडे भरले की आम्ही तयार. भगवान दत्त महाराजांच्या सान्निध्याने या क्षेत्राला आलेले चैतन्य हे अविनाशी आणि शाश्वत आहे. याची प्रचिती प्रत्येक भेटीत येत असली तरी महाराजांच्या सान्निध्यात येणार्‍या नवीन अनुभवांसाठी मन नेहेमी उतावीळ असते. महाराजांनी विचारलेले क्षेम कुशल म्हणजे थेट तीर्थरूपांच्या मायेची उब असते.

गुरू महाराजांच्या पादुकांना वंदन करून प्रदक्षिणा घालणे, पूजा प्रकार पाहणे, तेथील नित्य वास करीत असलेल्या सनकादिकांना वंदन करणे हे आपले उपासनेचे प्रकार म्हणजे गुरुचरित्रात शबराने केलेली शिवपूजा असावी तसे आहे. पूजा कशी करावी ते माहीत नाही, काय उपचार समर्पित करावेत ते माहीत नाही, कोणत्या स्रोत्राने स्तुती करावी हे ज्ञात नाही, तेव्हा आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून प्रदक्षिणा, वंदन या सारख्या उपचारांवर भगवान आपण संतुष्ट असावे, ही प्रार्थना करावी. गुरू महाराजांच्या काकड आरती, महापूजा, पालखीतील श्रींच्या उत्सवमूर्ती दर्शन आदी सेवा प्रकारांना उपस्थित असावे, महाराजांचे सुवासिक आणि मधुर तीर्थजल प्राशन करावे. तृप्त मनाने कृष्णामाईजवळ काही काळ बसावे, यासारख्या सुखाची अनुभुती केवळ घ्यावी तर नृसिंहवाडीतच.

येथे भेट देणे म्हणजे मरगळलेल्या मनाला पुन्हा एकदा नवसंजीवन प्राप्त होणे असं म्हणायला हरकत नाही. मृत देहाला संजीवन देणारा तो, आपल्या मनाला का बरं उभारी देणार नाही? भक्तांच्या सर्व चिंता स्वतः घेऊन त्यांना पुन्हा एकदा जगण्याची उमेद तो नित्य देत असतो. जे जे मनी इच्छावे ते ते भगवद्कृपे पावावे, या उक्तीनुसार कायम आपल्या इच्छा पूर्ण करणारा, भक्तांच्या समीप राहणारा असा तो संन्यस्त स्वरूपात इथे विराजमान आहे.

भक्तांचा उद्धार करायला परमात्मा इथे कायमस्वरूपी येऊन राहिला आहे. ऐसा जगदोद्धार देव कोठे? असं या देवाचं वर्णन आहे. नवविधेतील सर्वस्वात्मनिरूपण इथे महाराजांना निःसंकोच करावे. दक्षिणद्वार हा त्यांचा उजवा कान आहे. हे जाणून आपले मनोगत त्यांच्यापाशी सांगावे. एकदा सांगितलेल्या मनोगताची या देवदेवेश्वराला पुन्हा आठवण करून द्यावी लागत नाही. सर्व काही तो जाणून असतो.

नृसिंहवाडीला येणारा भक्तांचा ओघ पाहून विचलित व्हायचे काय कारण आहे? इतक्या भक्तांत आपली वर्णी महाराजांपाशी कशी लागेल असे वाटले तर भास्कर ब्राह्मणाची कथा आठवून पाहा. अनेकांच्या गर्दीत आपणहून गुरू महाराजांनी त्याची समाराधनेसाठी निवड केली. केवळ तिघांचा शिधा घेऊन आलेला तो महाराजांच्या कृपेस पात्र झाला. इतक्या भक्तांच्या गर्दीत आपले रक्षण महाराज कसे करतील.

केवळ हाक मारताच महाराज प्रकट होतील आणि आपले रक्षण करतील. नानापरीच्या पूजा अनेकांना करताना पाहून केवळ आपल्या नमस्काराने गुरूमहाराज काय म्हणतील हे मनातही आणू नका. केवळ नमस्काराने या गुरू महाराजांनी रजकाला राज्यपद बहाल केले आहे. मनातल्या भावनेला जो जाणतो आणि शुद्ध भावाला जो अव्हेरीत नाही त्या परमात्म्याला केवळ मानसपूजा देखील आनंद देते.

दत्त जयंती उत्सवानिमित्त येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत येथे भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. संस्थानचे अध्यक्ष मेघशाम पुजारी, चिटणीस महादेव पुजारी व सर्व विश्वस्त त्यांना या कामी पुढाकार घेतला आहे. दत्तजयंती उत्सवप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य स्वच्छता पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे व सर्व सदस्य यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.

-दत्तात्रय भा.पुजारी

दत्त क्षेत्राची आली प्रचिती

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा प्रांतातील भाविकांची वर्दळ सतत येथे असते. नेहमी दर्शनासाठी येणारे दत्त भक्त श्री अभय आचार्य यांनी माझ्यासह असंख्य भाविकांना या दत्त क्षेत्राची प्रचिती आली आहे. मनोहर पादुकांच्या दर्शनाने आजपर्यंत माझे मन कृतार्थ झाले, असेही दत्तजयंती उत्सवप्रसंगी बोलताना श्री आचार्य म्हणाले, मुंबई येथील मिलिंद कोरडे हे दत्तभक्त आहेत. येथील विविध प्रकारच्या सेवेमुळे आपणाला समाधान प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news