Cyclone Michaung | पुढील २४ तासांत ‘मिचौंग’ आणखी तीव्र होणार; ‘या’ राज्यात मुसळधार
पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. दरम्यान, काल (दि.) या कमी दाबाच्या पट्ट्याचे नैराश्येत रूपांतर झाले आहे. तर पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन ते पश्चिम, वायव्य दिशेने पुढे सरकेल, असेही भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Cyclone Michaung)
नैऋत्य बंगाच्या उपसागरात गेल्या ६ तासांपासून कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र नैराश्येत रूपांतर झाले आहे. आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हे चक्रीवादळ पुद्दुचेरीच्या ईशान्य-आग्नेयला ५०० किमी, चेन्नईच्या ईशान्य आग्नेयला ५१० किमी, नेल्लोरच्या आग्नेयला ६३० किमी अंतरावर केंद्रीत होणार आहे. पुढे हे मिचौंग चक्रीवादळ सोमवारी ४ डिसेंबरच्या सुमारास चेन्नई आणि मछलीपट्टणम दरम्यान उत्तर तमिळनाडू किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (Cyclone Michaung) ('Cyclone Michaung' पाहा लाईव्ह-https://zoom.earth/maps/satellite/#view=13.6,52.6,4z)
Cyclone Michaung : ३ डिसेंबरपासून पावसासह वाऱ्याची तीव्रता वाढणार
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मिचौंग' चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारा आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर प्रभाव पडणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून रविवारी ३ डिसेंबरपासून याठिकाणी पाऊस आणि वाऱ्यांच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
Cyclone Michaung : उपसागरात मुसळधार ते अतिमुसळधार
मिचौंग चक्रीवादळ किनारपट्टीच्या जवळ येत असताना IMD ने तमिळनाडू किनारपट्टी आणि अंतर्गत आंध्र प्रदेशात रविवार (दि.३) आणि सोमवारी (दि.४) 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. IMD ने तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथील रहिवाशांसाठी ३ डिसेंबरला अति मुसळधार (२०४.४ मिमी पेक्षा जास्त) आणि ४ डिसेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुढील चार दिवस नैऋत्य बंगालच्या उपसागरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, वादळी वारे आणि समुद्र खवळलेला असेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.