Cyclone Biparjoy
Cyclone Biparjoy

अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती, महाराष्ट्र, गोवा, केरळ व कर्नाटक किनारपट्टीला सावधानतेचा इशारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अरबी समुद्रात मंगळवारी सकाळी 11.30 वाजता कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन रात्री उशिरा चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हे वादळ महाराष्ट्र, गोवा, केरळ व कर्नाटक या चार राज्यांत धुमाकूळ घालू शकते.

गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती सुरू होती. त्याचे मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. ते मंगळवारी सकाळी महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीपासून 930 किलोमीटर, मुंबईपासून 1150 किमी, तर कर्नाटकपासून 1450 किलोमीटर अंतरावर होते. त्याचा वेग मंगळवारी सकाळी ताशी 50 ते 60 किमीवर होता, तर 7 रोजी तो 70 ते 80 किमी, 8 रोजी 80 ते 90 किमी, 9 रोजी 90 ते 100 किमी, त्याच दिवशी रात्री महाचक्रीवादळात रूपांतर होऊन त्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी, 10 रोजी ताशी 145 ते 155 किलोमीटरवर जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तज्ज्ञांमध्ये मतभेद

या चक्रीवादळामुळे राज्यात मान्सून लवकर येणार की नाही, याबाबात तज्ज्ञांत मतभेद आहेत. काही तज्ज्ञ म्हणतात, वादळामुळे मान्सूनपूर्व पाऊस मुंबई, कोकण व मध्य महाराष्ट्रात जास्त राहील. मात्र, त्यानंतर तो कमी होऊन मान्सून लांबेल. कारण, वादळ बाष्प पळवून नेते. काहींचे मत आहे की, या चक्रीवादळामुळे अडखळलेल्या मान्सूनला गती मिळेल.

चक्रीवादळाचे नाव 'बीपर जॉय'

हवामानतज्ञांच्या मते, या चक्रीवादळाचे नाव 'बीपर जॉय' असे असेल. ते बांगलादेशने सुचविले असून, या चक्रीवादळाचा शेवटचा मार्ग अजून निश्चित झालेला नाही. ते ओमेन आणि यमनच्या दिशेने जाईल, असा अंदाज आहे.

मान्सून मुंंबईत लवकर येण्याची शक्यता

या चक्रीवादळामुळे चार दिवस उशिरा येणारा मान्सून मुंंबईत लवकर येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक या राज्यांवर होणार आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढेल. मात्र, विदर्भ मराठवाड्यात त्या तुलनेत कमी पाऊस राहील, असा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news