कोल्हापूरला प्लास्टिकचा विळखा..! | पुढारी

कोल्हापूरला प्लास्टिकचा विळखा..!

कोल्हापूर, आशिष शिंदे : पृथ्वीवर केवळ प्लास्टिकच टिकते, असे म्हटले जाते. या एका वाक्यावरून प्लास्टिकचा धोका लक्षात येतो. कधीही नष्ट न होणारे हे प्लास्टिक जगभरासमोर काळ बनून उभे आहे. आज जगभरातील जवळपास प्रत्येक वस्तू प्लास्टिकच्या आवरणात बंद आहे. या वस्तूंचा वापर झाल्यानंतर हे प्लास्टिक एक तर रिसायकल होते किंवा तसेच पडून राहते. कोल्हापूर शहरामध्ये दररोज 180 ते 200 टन कचरा गोळा होतो. यामध्ये तब्बल 9 ते 10 टन प्लास्टिक असते, तर झूम प्रकल्पातील एकूण कचर्‍याच्या ढिगार्‍यांपैकी 10 टक्के ढिगारे हे केवळ प्लास्टिकचे आहेत. यामुळे कोल्हापूरकहो, आता तुम्हीच प्लास्टिकला नाही म्हणा आणि शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून बाहेर काढा.

असा होतोय प्लास्टिकचा पुनर्वापर

वर्षाला सुमारे साडेतीन हजार टन प्लास्टिक शहरात केवळ तयार होते. शहरात दररोज वापरलेले 9 ते 10 टन प्लास्टिक महापालिकेच्या वतीने गोळा केले जाते. या प्लास्टिकला श्रेडिंग मशिनच्या साहाय्याने बारीक केले जाते. यानंतर हे बारीक केलेले प्लास्टिक सिमेंट कंपन्यांना इंधन म्हणून वापरासाठी दिले जाते.

शहरात प्लास्टिक बनत आहे एक समस्या

शहरामध्ये प्लास्टिकचे प्रमाण वाढत चालले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, चिप्सची पॅकेटस् नदीपात्र, नाले, गटारींमध्ये फेकल्या जातात. यामुळे गटारी, ड्रेनेज मोठ्या प्रमाणात तुंबतात. परिणामी, पावसाळ्यामध्ये नाल्यांचे पाणी नदीला मिळून नदीच्या पाण्यात प्लास्टिकचा थरच दिसू लागतो. यामुळे शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न करावा, तसेच वेळीच ओल्या आणि सुख्या कचर्‍यासोबत प्लास्टिकचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. कचरा फेकताना प्लास्टिकचा कचरा वेगळा करावा.

मानवी आरोग्यासाठी प्लास्टिक घातक

युनायटेड नेशन्सच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 500 अब्ज प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. या वापरून फेकून दिल्यानंतर याचे कचर्‍याच्या ढिगात रूपांतर होते. सिंगल यूज्ड प्लास्टिक वापरानंतर एक तर जमिनीमध्ये पुरले जाते किंवा फक्त तसेच फेकले जाते. धूर, धुळीमुळे त्यांचे सूक्ष्म कण होतात आणि हवेत व पाण्यात विरघळतात. हे घातक प्लास्टिकचे कण पाण्यावाटे आणि हवेवाटे आपल्या शरीरात पोहोचण्याचा धोका असतो. यामुळे गंभीर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Back to top button