बर्मिंगहॅम; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या (CWG 2022) अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष संघास पुन्हा एकदा बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव स्विकारावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात भारताचा ७-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. अशा पद्धतीने पुन्हा एकदा राष्ट्रकूलस्पर्धेत हॉकीमध्ये भारतीयांचे सुवर्णस्वप्न भंगले आणि पुन्हा एकदा रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने या विजयासह राष्ट्रकूलमध्ये सलग सातव्यांदा सुवर्ण पदकास गवसणी घातली तर तब्बल सहा वेळा ऑस्ट्रेलियाने भारतीय हॉकी संघास राष्ट्रकूलच्या अंतिम सामन्यात पराभूत करण्याची कामगिरी बजावली आहे.
ऑस्ट्रेलियाने (CWG 2022) आक्रमक सुरुवात करत पहिल्या अर्धातासातच भारताविरुद्ध पाच गोल डागले. त्यांनतर दोन गोल करत भारतीयांना संपूर्ण सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच मिळू दिली नाही. ऑस्ट्रेलियाने इतका आक्रमक खेळ केला की भारताला एक सुद्धा गोल करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन, जेकब अँडरसन यांनी प्रत्येकी 2 गोल केले. तर टॉम विकहम, ब्लॅक गोव्हेर्स, फ्लिन ओगलव्ही यांनी प्रत्येकी 1 गोल केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये 2, दुसर्या क्वार्टरमध्ये 3 तर तिसर्या क्वार्टरमध्ये 1 आणि चौथ्या क्वार्टरमध्ये 1 गोल केला. भारताला ऑस्ट्रेलियाचे आक्रमण मोडून काढत एकही गोल करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल स्पर्धेत सातव्यांदा सुवर्णपदक जिंकले.
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलपोस्टवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दोन गोल डागले. पहिल्या दोन क्वार्टरमध्येच 5-0 असा पिछाडीवर पडलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने तिसर्या क्वार्टरमध्ये अजून एक गोल डागत आघाडी 6-0 अशी केली. ऑस्ट्रेलियाने तिसर्या क्वार्टरमध्ये एकच गोल डागला. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने एक गोल दागत 7 – 0 अशी आघाडी घेतली. अखेर ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 – 0 असा पराभव करत सातव्यांदा सुवर्णपदक पटकावले.
इंग्लंडमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारताने पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण 15 पदके जिंकली. सिंधू आणि लक्ष्यच्या सुवर्णानंतर साथियानने कांस्यपदक जिंकले आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके जिंकली आहेत.