मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई येथे मास्टर सभा घेत विरोधकांवर तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तमाम विरोधकांना सडेतोड उत्तरे दिली. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखिल टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत 'अरे छट… हा तर निघाला आणखी एक टोमणा बॉम्ब' असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
मुंबई येथील मास्टर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हणाले, यांनी बाबरी तर पाडली नाहीच पण, बाबरी चढायला गेला असता तर तुमच्या पहिल्या पावलांनी बाबरी ढासळली असती, असा टोला लगावला. तसेच तुमचे वय काय आणि तुम्ही बोलता काय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही आयोद्धेला बाबरी पाडायला गेलो होतो म्हणायला ती काय शाळेच सहल होती की कॉलेजची सहल होती, अशी टीका सभेदरम्यान केली. शिवाय मेट्रोचे काम फडणवीस आणि केंद्रातील सरकारनेच अडवल्याची टीका ठाकरे यांनी केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी ट्वीटद्वारे लिहले आहे, 'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट हा तर निघाला… आणखी एक टोमणे बॉम्ब…जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा'!
यानंतर आणखी एक ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची मेट्रो-3 चे काम आम्ही तीन वर्षांत 80 टक्के पूर्ण केले. एकच काम होते, जे 9 महिन्यांत पूर्ण व्हायचे होते. पण, सरकारने सर्व कामे थांबविली. पण, आता पुढचे 4 वर्ष ही आशियातील सर्वांत मोठी मेट्रो खोळंबली. मुंबईकर योग्यवेळी त्यांना शिक्षा देणारच! असे देखिल ट्वीटद्वारे फडणवीसांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.