चिपी विमानतळावर टीकेचे बाण; चिमटे, टोले पायगुण, गालबोट, टॅक्स फ्री…

चिपी विमानतळावर टीकेचे बाण; चिमटे, टोले पायगुण, गालबोट, टॅक्स फ्री…
Published on
Updated on

चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य करत टीका केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत चिमटे काढत, टोले लगावत चिपी विमानतळावर टीकेचे बाण सोडले.

चिपी विमानतळाच्या श्रेयवादाचा मुद्दा गेले अनेक दिवस गाजत आहे. उद्घाटनाच्या एक दिवस आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत विमानतळाला कुणी विरोध केला याचा भांडाफोड करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार ते भाषणाला उभे राहिले. तत्पुर्वी सूत्रसंचालनाला उभे असलेल्या खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली. राऊत यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा उल्लेख विमानतळाचे मालक असा केला होता.

काय म्हणाले नारायण राणे

'हा कार्यक्रम नेमका कुणाचा आहे. इथे आल्यावर मला कळालं की याचा मालक कोण? हा कार्यक्रम एमआयडीसीचा आहे, आयरबीच्या म्हैसकर यांचा आहे की देसाई प्रायव्हेट लिमिटेडचा आहे. काय प्रोटोकॉल आहे की नाही. या विमानतळाला कुणी विरोध केला हे सर्वांना माहीत आहे. तोंडवलीला कुणी आंदोनल केले हेही माहीत आहे. आज विरोध करणारे व्यासपीठावर आहेत. आदित्य ठाकरे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. त्यांना काही बोलणार नाही. पण त्यांनी उद्धवजींना अभिमान वाटेल असे काम करून दाखवावे. त्यांनी टाटाच्या अहवालाचा अभ्यास करावा आणि त्यानुसार पैसेही द्यावेत. चिपी विमानतळासाठी मी प्रयत्न केले. त्यामुळे आजचा दिवस उभा आहे.

सुभाष देसाईंनी पायगुण काढला

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे प्रास्ताविक करताना म्हणाले, चांगले काम होण्यासाठी पायगुण लागतो. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पायगुण काय असतो हे यानिमित्ताने दिसून आले आहे.

उद्धव ठाकरेंनी चिपी विमानतळावर टीकेचे बाण

ठाकरे यांनी राणेंच्या टिकेचा आपल्या भाषेत समाचार घेतला. ते म्हणाले, ' मातीचा एक संस्कार असतो.कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्या आहेत. हा काही मातीचा दोष नाही. विमानतळासाठी तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे वेगळे. कोकणात पर्यटकांना दाखविण्यासांखे अनेक किल्ले आहेत, आता किल्ला आपणच बांधला असे कुणीतरी म्हणेल. कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. त्याची खरी सुरुवात आज झाली आहे. महाराष्ट्राच्या सर्व पक्षांचे नेते व्यासपीठावर आहेत. हा आनंदाचा क्षण आहे. मात्र, या आनंदाला कुणाची दृष्ट लागू नये यासाठी गालबोट लावले जाते तसे गालबोटही येथे आहे. नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे खोटं बोलणे बाळासाहेबांना आवडत नव्हते. खोटं बोलणाऱ्यांना त्यांनी खड्यासारखे बाजुला केले. राणे म्हणाले की विकासकामांत राजकारण करू नये, मात्र, त्यांना आठवत नसेल की, त्यांनी मेडिकल कॉलेजसाठी फोन केला आणि मी लगेच सही केली.

व्‍यासपीठावर आले… मात्र एकमेकांना टाळलेच

काही दिवसांपूर्वीच राणे विरुद्‍ध ठाकरे संघर्ष राज्‍याने अनुभवला. याची धग कायम असतानाच आज मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक व्‍यासपीठावर आले. व्यासपीठावर शेजारी शेजारी बसले मात्र, दोघांमध्ये संवाद झाला नाही. दोघांमधील बैठक व्‍यवस्‍थेत केवळ अडीच फुटांचे अंतर होते. सर्वांच्‍या नजरा या दोघांवरच खिळल्‍या होत्‍या. यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहणे टाळले. कार्यक्रम संपेपर्यंत दोन्‍ही नेत्‍यांच्‍या देहबोलीत एक अप्रत्‍यक्ष तणावही दिसला. एकाच व्‍यासपीठावरील बैठक व्‍यवस्‍थेमधील अंतर अडीच फुटांचे असले तरी दोघांमधील मतभेदांचे अंतर हे हजारो मैल असल्‍याचा हा प्रसंग सर्वांनीच अनुभवला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news