Crime Diary | गुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग!

Crime Diary | गुन्हेगारांची मानसिकता; भयावह पातळीचा राग!

गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा प्रचंड राग हा गुन्हेगाराच्या मनात आलेला असतो. रागाचा हा भर अत्युच्च पातळीवर पोहोचलेला असतो! धोकादायक स्तरावर पोहोचलेला असतो!! – आणि जेव्हा असे घडते तेव्हा अनेक लक्षणं ही ठळकपणे नजरेस पडत असतात. ( Pudhari Crime Diary )

संबंधित बातम्या

अनेक लक्षणे!

प्रचंड मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा करणे, किंचाळणे, कोणतीही गोष्ट ऐकून न घेता फटकारणे, अशा गोष्टी गुन्हेगार करत राहतो. जेव्हा जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा अनेक लक्षणे गुन्हेगारात दिसून येतात. जसे की प्रचंड घाम येणे, बोलताना अडखळणे किंवा तोतरेपणा येणे, छाती अवघडल्यासारखे वाटणे, छातीत धडधडणे, अंगाला हिसका देणे, इत्यादी.

समाधान वाटते!

जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा गुन्हा घडल्यानंतर शांतता मनामध्ये पसरते आणि गुन्हेगार समाधान पावतो! परंतु, हे समाधान काही क्षण टिकते. आणि त्यानंतर एक प्रकारचा अपराधीपणा सुरू होतो, पश्चाताप सुरू होतो. अशी सारी लक्षणे ही अधूनमधून स्फोटक वागण्याची विकृती या मनोरोगामध्ये आढळतात. ज्यांना इंग्रजीमध्ये इंटरमिटंट एक्सप्लोजीव डिसॉर्डर किंवा आयईडी म्हणतात.

जसे सेराटोनिन नावाचे मेंदूतील रसायन हे अशा वेळी कमी होते तसेच हायड्रोक्सी इंडोल अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड नावाचे रसायन हे मज्जा रज्जूच्या द्रव्यातले कमी होते. अशावेळी स्फोटक वागण्याचा उद्रेक होतो. हे अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड कमी होणे हे आनुवंशिक देखील असू शकते, असे आढळले आहे.

धोकादायक पातळी!

कपाळाच्या मागील भागातील मेंदूच्या प्री-फ्रंटल कॉर्टेक्स नावाच्या भागाला इजा झाली, तर स्फोटक वागण्याचा प्रकार उद्भवतो आणि या भागातील बिघाडामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील बिघडते. त्यामुळे मेंदूला साखरेचा पुरवठा कमी पडला, तर मेंदूला ऊर्जा कमी पडते आणि स्फोटक कृत्य घडू शकते. अशावेळी निरर्थक बडबड आणि शाब्दिक वाद किंवा मारामार्‍या करण्यापर्यंत गुन्हेगाराची मजल जाते.

वस्तूंची तोडफोड करणे किंवा फोडून टाकणे, व्यक्तींना मारहाण करणे किंवा जीवे मारणे, इथपर्यंत त्यांची कृती धोकादायक बनते. साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांचे स्फोटक वागणे उद्भवू शकते. मोठमोठ्या हवेतल्या गप्पा मारणे आणि त्याचबरोबर निराशाग्रस्त राहणे अशा मानसिक अवस्थेला बायपोलर रोग म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये निराशा विकृती आणि उन्माद विकृती एकत्रितपणे आलटून-पालटून येत असतात. अशा रुग्णांमध्ये देखील स्फोटक वागण्याचा उद्रेक दिसून येतो.

बिहेविअर थेरपी!

अशा गुन्हेगारांसाठी उपचार म्हणून कॉग्नेटिव्ह बिहेविअर थेरपी या मानसोपचाराचा खूप मोठा उपयोग होतो. काही वेळा औषधेसुद्धा द्यावी लागतात. जेव्हा कधीही समाजामध्ये अशा पद्धतीचे गुन्हे घडत असतात जेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते किंवा एखाद्याच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते आणि त्याचबरोबर तेथील व्यक्तींना मारहाण केली जाते, तेव्हा हे करणारे गुन्हेगार हे या रोगाने ग्रस्त असतात, हे समजणे महत्त्वाचे आहे आणि त्यांच्यावर उपचार करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते! (Crime Diary )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news