Crime news : चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ; वरिष्ठांकडे तक्रार | पुढारी

Crime news : चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ; वरिष्ठांकडे तक्रार

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा :  येथील शेवगाव-गेवराई राज्य मार्गालगत मारूती वस्ती नाजिक शनिवारी (दि.3) भरदिवसा माजी सैनिक रामनाथ ढेसले यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने तीन लाखांचे दागिने लांबविले. या घटनेची तक्रार देण्यासाठी दुपारी 2 वाजता ढेसले शेवगाव पोलिस ठाण्यात गेले असता, येथील ठाणे अंमलदाराने तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करून रात्री 10 वाजेपर्यंत निष्कारण बसून ठेवले. त्यानंतर तक्रार घेतली. तीन लाखांचे दागीने चोरी गेल्याचे दुःख बाजूलाच राहिले, पण दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात ताटकळत बसावे लागले, याचे दुहेरी दुःख झाल्याचे ढेसले यांनी सांगितले.

पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ का केली आणि रात्री 10 वाजेपर्यंत का थांबून ठेवले, याची चौकशी होऊन संबंधित ठाणे अंमलदार, पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, चोरीच्या घटनेचा तपास लावून आरोपीला अटक करावी, अशी मागणी रामनाथ ढेसले यांचा मुलगा भागवत ढेसले आणि जावई माजी सैनिक गोरख कोहक यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

कदाचित यामुळे उशीर : ससाणे
तक्रार घेण्यास टाळाटाळ किंवा तक्रारदाराला पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत थांबवून ठेवण्याचा प्रकार मुद्दाम करीत नाहीत. प्रत्येक तक्रार संगणकावर टाईप करून ऑनलाईन करावी लागते. अगोदरच्या तक्रारी पूर्ण झाल्याशिवाय पुढची तक्रार घेता येत नाही. ढेसले यांच्या अगोदर नंबर असतील. त्यामुळे कदाचित उशीर झाला असेल, असे बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक राजू ससाणे यांनी सांगितले.

Back to top button