नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा : तीव्र दुष्काळ व दुधाचे दर पडल्यामुळे आळे येथील भरणाऱ्या गाई बाजारात गाईंच्या किमती उतरल्या असून गिर्हाईक ही मिळणे कठीण झाले आहे. गायी खरेदी – विक्रीवर परिणाम होताना दिसत आहे.गुरुवारी (दि.२८) भरलेल्या गाय बाजारात लहान मोठ्या सुमारे पाचशे गायी विक्रीला आल्या होत्या,मात्र पूर्वी सारखे गाय खरेदीला गिऱ्हाईक धजावत नव्हते,यंदा दुष्काळामुळे उन्हाळ्यात दुभत्या जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रमध्ये आळे येथील गाईंचा बाजार मोठा प्रसिद्ध आहे. दर गुरुवारी भरणारे या गायी बाजारामध्ये पारनेर, संगमनेर,अहमदनगर,श्रीगोंदा, आंबेगाव, खेड, अकोले या तालुक्यामधून व्यापारी आणि शेतकरी गायी विक्री व खरेदीला येत असतात.गुरुवारी या बाजारामध्ये चांगली दुधाळ गाय फक्त सव्वा लाख रुपये किमतीपर्यंत विक्री झाल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.यापूर्वी मात्र दीड ते दोन लाख रुपये किमतीला अशा गायीची विक्री झाल्याचे ही या व्यापाऱ्याने सांगितले.
गाय विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापारी यांची जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जाते तसेच जनावरांच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. या गाय बाजार मध्ये संकरित व काही प्रमाणात गावठी गायी सुद्धा विक्रीला येतात.या गाय बाजारमध्ये कालवडींची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते गुरुवारी साधारण चारशे ते पाचशे गायी विक्रीला आल्या होत्या.
आळे येथील गाय बाजारामध्ये दर गुरुवारी आम्ही गाई विक्रीसाठी येतो महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक चांगला बाजार असल्यामुळे आम्ही येथे गाय विक्री व खरेदीला येथे येत असतो. आमची शेतकऱ्याकडून फसवणूक होत नाही व आम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करीत नाही .आळेफाटा येथील गाय बाजार शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असल्याचे संगमनेरचे गाय व्यापारी गफुरभाई शेख यांनी सांगितले.
हेही वाचा :