Covid Hit Lung Damage : कोरोनानंतर भारतीयांच्या फुफ्फुसांवर सर्वाधिक दुष्परिणाम; काय सांगतोय अभ्यास?

Covid Hit Lung Damage:
Covid Hit Lung Damage:

पुढारी ऑनलाईन डेस्क : युरोपियन देश आणि चीनमधील लोकांच्या तुलनेत कोरोनाचा भारतीयांच्या फुफ्फुसांवर सर्वाधिक दुष्परिणाम झाला आहे, अशी माहिती नवीन अभ्यास संशोधनातून समोर आली आहे. या विषयाचे संशोधन तमिळनााडूतील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केले आहे. या अभ्यासात कोरोनानंतर भारतीय रूग्णांच्या फुफ्फुसाचे कार्य बिघडल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. (Covid Hit Lung Damage)

कोरोनामधून बरे झालेल्या भारतीय रूग्णांमध्ये लक्षणीय प्रमाणात फुफ्फुसाचे कार्य बिघडलेले होते आणि अनेक महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून आली होती, असे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोरने प्रकाशित केलेल्या अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच युरोपियन आणि चिनी लोकांच्या तुलनेत भारतीयांच्या फुफ्फुसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे आढळले. कोरोनानंतर फुफ्फुसाचा संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य स्थितीत येण्यासाठी साधारण एक वर्षांहून अधिक काळ लागला, तर काहींना दीर्घकालीन फुफ्फुस संसर्गाला सामोरे जावे लागले, असल्याचेदेखील अभ्यासात म्हटले आहे. (Covid Hit Lung Damage)

वेल्लोर (तामिळनाडू) येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केलेला हा अभ्यास हा देशातील सर्वात मोठा अभ्यास म्हणून ओळखला जातो. यामध्ये 207 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेदरम्यान आयोजित केलेला हा अभ्यास अलीकडेच PLOS ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. (Covid Hit Lung Damage)

कोरोनातून बरे झाल्यानंतर २ महिन्यांनी फुफ्फुस चाचण्या

कोरोना झाल्यानंतर २ महिन्यांनी बरे झाल्यानंतर या रूग्णांच्या फुफ्फुसांचा अभ्यास करण्यात आले. यामध्ये सौम्य, मध्यम आणि गंभीर कोरोनाग्रस्त रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रूग्णांच्या संपूर्ण फुफ्फुसाच्या कार्य चाचण्या, सहा मिनिटांची चाल चाचणी, रक्त चाचण्या आणि जीवनाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले गेले. यामधून हा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे संशोधनात म्हटले आहे. (Covid Hit Lung Damage)

गॅस ट्रान्सफर (DLCO) : फुफ्फुसाची सर्वात महत्त्वाची चाचणी

फुफ्फुसासंदर्भातील सर्वात महत्त्वाची चाचणी म्हणजे गॅस ट्रान्सफर (DLCO) जी हवेतून श्वास घेतल्यानंतर रक्तप्रवाहात ऑक्सिजन हस्तांतरित करण्याची क्षमता मोजते. यामध्ये कोरोना झालेल्या रूग्णांमधील ४४ टक्के लोक प्रभावित आढळले असल्याचे म्हटले आहे.  याला ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या (CMC) डॉक्टरांनी "अत्यंत चिंताजनक" म्हटले आहे. तर ३५ टक्के लोकांमध्ये फुफ्फुसाचा दोष दिसून आला. ज्यामुळे श्वास घेताना फुफ्फुसाच्या हवेसह प्रसरण पावण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच ८.३ टक्के लोकांध्ये श्वास घेताना अडथळा आणणारा फुफ्फुसावरील दुष्परिणाम दिसून आला. जीवनाच्या गुणवत्तेच्या चाचण्यांनीदेखील प्रतिकूल परिणाम दिसून आल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या संदर्भातील माहिती या अभ्यासाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. डी. जे. क्रिस्टोफर (पल्मोनरी मेडिसिन विभाग, सीएमसी, वेल्लोर) यांनी TOI शी बोलताना दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news