फुफ्फुसातील रक्त गुठळीवर ‘एआय’ शस्त्रक्रिया | पुढारी

फुफ्फुसातील रक्त गुठळीवर ‘एआय’ शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. रुग्णालयांमध्येही ‘एआय’चा वापर केला जात आहे. आता गुडगावमधील एक खासगी रुग्णालयात पल्मोनरी एम्बोलिझमने ग्रस्त असलेल्या 62 वर्षांच्या एका रुग्णावर ‘एआय’च्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या आजारात फुफ्फुसामध्ये ब्लड क्लॉट म्हणजेच रक्ताची गुठळी तयार झालेली असते. हॉस्पिटलचे चेअरमन आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नरेश त्रेहान यांचा दावा आहे की फुफ्फुसातील ब्लड क्लॉट हटवण्यासाठी देशात प्रथमच एआय तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

देशभरात सध्या हार्ट अ‍ॅटॅकची प्रकरणे वाढत आहेत. त्याचे एक मोठे कारण शरीरात बनणार्‍या रक्ताच्या गुठळ्या असतात. अशा गुठळ्यांमुळे रक्तप्रवाहाच्या मार्गात अडथळा येत असतो. डॉ. त्रेहान यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षी जुलैमध्ये एआय तंत्राचा वापर सुरू केला. आतापर्यंत या तंत्राच्या सहाय्याने 25 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रक्रियेत रक्त कमी जाते आणि रुग्ण लवकर बरा होतो. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ राहण्याची आवश्यकता राहत नाही.

आता या तंत्राने पल्मोनरी एम्बोलिझमने ग्रस्त असलेल्या रुग्णांवरही उपचार होऊ शकतात हे दिसून आले आहे. या आजारात ब्लड क्लॉट फुफ्फुसांच्या धमनीमध्ये रक्तप्रवाह ब्लॉक किंवा बंद करतो. डॉ. त्रेहान यांच्या म्हणण्यानुसार एआय तंत्राच्या सहाय्याने छाती किंवा धमन्यांमध्ये चिरफाड केल्याशिवायच गुठळी हटवता येऊ शकते. या प्रक्रियेत केवळ पंधरा मिनिटांचा वेळ लागतो. पूर्वी यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागत होते आणि त्यामध्ये धोकाही बराच असे.

संबंधित बातम्या
Back to top button