कोल्हापूर : सुनील कदम
काल भेटलेला कुणी तरी धडधाकट तरुण आज अचानक निवर्तल्याचे समजत आहे, वयाच्या विशी-पंचविशीतच लोकांमध्ये हृदयविकार आणि मधुमेह बळावताना दिसत आहेत, कुणा कुणाला त्यांच्या सात पिढ्यांमध्येही आढळून न आलेले आनुवंशिक आजार जडताना दिसत आहेत, तर कुणी चक्क नपुंसकत्व आल्याचा दावा करीत आहे. हे बहुसंख्य प्रकार कोरोना लसीकरणानंतरच मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जे कोरोनाबाधित नव्हते; पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेतली त्यांच्यामध्ये भयंकर दोष निर्माण झाल्याचे आणि यापैकी काहींचा मृत्यूही झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोना लसींच्या भयावह दुष्परिणामांबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (Corona Vaccine)
डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेत कोरोनाचा प्रथम उद्रेक झाला आणि मार्च 2020 पर्यंत कोरोनाचा जगभर फैलाव झाला. भारतात याची सुरुवात 30 जानेवारी 2020 रोजी केरळमधून झाली. त्यानंतर जगभरातच कोरोनाच्या लसींबाबत युद्धपातळीवर संशोधन सुरू झाले. 24 जानेवारी 2020 रोजी चीनने 'कॅनसिनो' नावाची लस शोधून काढल्याचा दावा केला आणि लष्करासाठी त्याचा आपत्कालीन वापरही सुरू केला. त्यानंतर 11 ऑगस्टला रशियाने 'स्पुटनिक' आणि अमेरिकेने 20 नोव्हेंबरला 'फायझर' नावाची लस शोधून काढल्याचा दावा केला. हळूहळू 'कोव्हिशिल्ड', 'कोव्हॅक्सिन', 'मॉडर्ना' अशा 19 कोरोना प्रतिबंधक लसींचा शोध लागत गेला आणि तत्कालीन आरोग्य आणीबाणी विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने या लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली; पण कोणतीही लस ही परिपूर्ण किंवा अंतिम असल्याचा दावा संशोधक कंपन्यांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही केलेला नव्हता. त्यामुळे कोरोनाचा हळूहळू प्रभाव कमी होताच जागतिक आरोग्य संघटनेने 5 मे 2023 पासून कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरावर निर्बंध घातलेले असून, या लसींबाबत सध्या नव्याने संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. कोरोना लसींचा आपत्कालीन वापर सुरू झाल्यानंतर भारतासह जगभरातूनच वेगवेगळ्या तक्रारींचा ओघ सुरू झाला होता. लस घेतल्यानंतर छातीत दुखणे, अंगावर पुरळ उठणे, ताप येणे, कणकण येणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, सांधेदुखी, डोकेदुखी, सर्दी-पडसे, खोकला अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. त्या त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेसह संबंधित लस तयार करणार्या कंपन्यांनी आणि आरोग्य क्षेत्रातील स्थानिक तज्ज्ञांनीही याबाबत खुलासे केलेले आहेत. लस घेतल्यानंतर उद्भवणारे किरकोळ आजार हे लसींच्या प्रभावाचे लक्षण असून, त्यात विशेष काही नाही, असे संबंधितांनी स्पष्ट केलेले होते. मात्र, त्यावेळीही सर्वच लोकांचे समाधान झालेले नव्हते आणि लसींच्या परिणामकारकतेपेक्षा त्यांच्या दुष्परिणामांबद्दलच लोकांमध्ये चर्चा होताना दिसत होती.
सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार, कोरोनाचे लसीकरण बंद झालेले आहे; पण अलीकडच्या काही दिवसांमध्ये वाढलेले हृदयरोगाचे, मधुमेहाचे आणि प्रामुख्याने तडकाफडकी मृत्यू होण्याचे प्रमाण, यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा 'हा कोरोना लसींचाच दुष्परिणाम' असल्याची चर्चा सुरू झालेली दिसत आहे. योग्य ते सखोल संशोधन न करता अत्यंत घाईगडबडीने बाजारात आणलेल्या कोरोना लसींचाच हा प्रताप असल्याची भावना लोकांमध्ये बळावताना दिसत आहे. त्यामुळे याबाबतीत संबंधित जबाबदार आरोग्य संस्थांनी व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीच लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात अशीच एखादी साथ उद्भवल्यास लोक लसीकरण करून घ्यायलाच तयार होणार नाहीत, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
सुमारे 80 टक्के रुग्णांना अनेक विकार आता त्रास देत आहेत. अनेकांना घाणेंद्रियांचे विकार जडले आहेत. आम्ही विकसित केलेल्या अल्फाक्सोमीटर यंत्राद्वारे सुमारे 200 रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यांना 10 प्रकारचे गंध ओळखण्यास दिले असता 80 टक्के रुग्णांना ते ओळखताच आले नाहीत. कोरोनामुळे रुग्णांच्या चेतासंस्थेवर परिणाम झाला आहे. गंध ओळखणारी संवेदनाच अनेक रुग्णांत नाहीशी झाली असल्याचे पुढे आले. – डॉ. निक्सॉन अब्राहम, (शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान संस्था, पुणे)
हेही वाचा