अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कोरोना चाचणीसाठी गेलेल्या एका तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्या एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अल्केश अशोकराव देशमुख (३२, रा. पुसदा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ जुलै २०२० रोजी दुपारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मोदी ट्रामा केअर रुग्णालयात घडली होती. (Corona Test)
पीडित तरुणी काम करणाऱ्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमधील एक कर्मचारी २४ जुलै २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे स्टोअरमधील २० कर्मचाऱ्यांना २८ जुलै रोजी दुपारी बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर हॉस्पिटल येथे कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. येथे अल्केश देशमुख हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता.
त्याच्याकडे तोंडाद्वारे स्वॅब घेण्याची जबाबदारी होती. यावेळी अल्केशने तरुणीसह तिची मैत्रिण व इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले. त्यानंतर त्याने पीडितेला तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता गुप्तांगाद्वारे स्वॅब घेऊन टेस्ट करावी लागेल, असे सांगितले.
त्यामुळे पीडितेने ही बाब आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर दोघींनी अल्केशकडे जाऊन रुग्णालयात महिला कर्मचारी नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्केशने तुम्हाला वाटल्यास जाऊ शकता, असे सांगितले. त्यानंतर अल्केश हा दोघींनाही आतमधल्या खोलीमध्ये घेऊन गेला. त्याने पीडितेचा गुप्तांगात स्टीक टाकून स्वॅब घेतला.
त्यानंतर पीडिता ही आपल्या कार्यस्थळी परत आली. मात्र, या प्रकाराबाबत संशय आल्याने पीडितेने आपल्या भावाला याबाबत माहिती देऊन चौकशी करायला लावली. त्यानुसार भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता, अशाप्रकारे कोणतीही चाचणी होत नसल्याचे समजले.
त्यानंतर पीडितेला मोबाइलवर काही मेसेज प्राप्त झाले होते. पीडितेने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, स्वॅब घेणारा मीच असल्याचे अल्केशने सांगितले. हा गंभीर प्रकार पाहून पीडितेने बडनेरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अल्केशविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
बडनेरा पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता १२ साक्षीदारांची साक्ष तपासली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने आरोपी अल्केश देशमुख याला १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख यांनी यशस्वी युक्तीवाद केला.