बीजिंग/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : Corona : चीनमध्ये कोरोना लॉकडाऊनच्या विरोधातील जनप्रक्षोभानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बरेच निर्बंध शिथिल केले. त्यानंतर चीनमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वेगाने वाढलेला आहे. बीजिंगमधील 24 तास स्मशानभूमी धगधगत आहेत. विविध स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत प्रेतांच्या रांगा आहेत. दरम्यान, येत्या 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के, तर जगभरातील 10 टक्के लोक कोरोना संक्रमित झालेले असतील, असा अंदाज अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी वर्तविला आहे.
Corona : डिंग यांच्या अंदाजानुसार कोरोनामुळे चीनमध्ये 2023 अखेरपर्यंत 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन या संस्थेनेही काही दिवसांपूर्वी असाच अंदाज वर्तवला होता.
Corona : चीनमध्ये झिरो कोरोना पॉलिसी रद्द केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून रुग्णालयांतील सर्व खाटा भरल्या आहेत. औषधांची टंचाई असून मेडिकल स्टोअर्सवर लांबच लांब रांगा खरेदीसाठी आहेत. बीजिंगमधील विविध स्मशानभूमींतून 24 तास अंत्यसंस्कार सुरू असून, एका वृत्तानुसार वार्ताहर वृत्त संकलनासाठी काही स्मशानभूमींत गेला असता दोन हजारांपर्यंत मृतदेह प्रतीक्षेत होते.
Corona : तासागणिक रुग्णसंख्या दुप्पट
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या तासनिहाय दुप्पट होत चाललेली आहे. चीनमध्ये कोरोनाची पहिली लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. चीनमध्ये आता एक आठवडाभर नूतन चांद्रवर्ष साजरे होईल. लाखो लोक या कालावधीत प्रवास करतात. प्रचंड गर्दी बाजारात असते. चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात दुसरी लाट येईल. तिसरी लाट फेब-ुवारी ते मार्चच्या अखेरीस येऊ शकते.
Corona : चिनी दावाही बनावट!
चीनमध्ये 90 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाल्याचा चीनचा दावाही फसवा असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये 50 टक्के वृद्धांनी लस घेतलेलीच नाही. जे काही लसीकरण चीनमध्ये झाले, त्यात चीनची लसही तकलादू ठरल्याचे समोर आले आहे.