चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या अगदी दुसऱ्या दिवशी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी देशातून दुपारी ४.२९ ते ६.१७ वाजेपर्यंत खंडग्रास सूर्यग्रहणाचे (Solar Eclipse 2022) दर्शन होणार आहे. सारोस १२४ मालिकेतील हे ग्रहण आहे. दर १८.११ वर्षाने येणार्या एकूण ७३ ग्रहणाचा यामध्ये समावेश आहे. हे सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असून यानंतर ९ वर्षाने भारतात केरळमधून २०३१ मध्ये कंकणाकृती आणि काश्मीर येथून २० मार्च २०३४ रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना दिली.
२५ ऑक्टोबरच्या ग्रहणाची (Solar Eclipse 2022) सुरुवात भारतीय वेळेनुसार २.२९ वाजता आईसलँड मधून होईल. सर्वाधिक ग्रहन ४.३० वाजता रशियातील सैबेरिया येथून तर ग्रहण मोक्ष ६.३२ वाजता अरेबिअन समुद्रात होईल. हे सुर्यग्रहण उत्तर गोलार्धातून युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका, मध्य आशिया येथून दिसेल. उत्तर गोलार्धात ८० % सूर्य झाकाळला जाईल. तर अक्षांशानुसार दक्षिणेकडे ग्रहण कमी दिसेल. भारतातून ग्रहण गुजरात मध्ये २० %, महाराष्ट्र १० % तर केरळात ३% ग्रहण दिसेल. भारतातील पूर्वेत्तर राज्य वगळता देशातील सर्व राज्यातून कमी अधिक प्रमाणात हे ग्रहण दिसेल. महाराष्ट्रातील रेखांशानुसार पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात जास्त वेळ आणि जास्त मोठे ग्रहण पाहावयास मिळेल.
देशात सर्वात जास्त ग्रहणकाळ गुजरात मधून भूज येथे १.४३ तास तर राजकोट येथे १.३६ तास दिसेल. सर्वाधिक कमी काळ कोलकाता येथून केवळ १२ मिनिटे आणि कन्याकुमारी येथे २८ मिनिट ग्रहण दिसेल. तर पश्चिमेकडील वाराणसी, रायपूर येथे ४१ मिनिटे, तर दिल्ली, आणि पश्चिम भारतात एक तासाच्या वर ग्रहण पाहता येइल. महाराष्ट्रात सर्वाधिक काळाचे ग्रहण पालघर आणि मुंबई येथे एक तास २१ मिनिटे असेल. तर सर्वाधिक कमी गडचिरोली येथे ४७ मिनिटे असेल. सर्वात मोठ्या आकाराचे ग्रहण (चंद्र ग्रस्त भाग) १५ ते २० % गुजरात आणि राजस्थान राज्यात तर महाराष्ट्रात ८ ते १० %, दक्षिण भारतात ३ ते ५ % दिसेल.
Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण कसे घडते
दर महिन्याच्या अमावास्येला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, परंतु ते एका रेषेत येत नाही. त्यांच्या कक्षेच्या प्रतलांत ५ अंशाचा फरक असतो. त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही आणि ग्रहण होत नाही. ग्रहणात ज्या ठिकाणी चंद्राची गडद छाया पडते. तिथे चंद्राच्या कमी जास्त अंतरामुळे खग्रास (Total), कंकणाकृती (Annular) ग्रहण तर उर्वरित उपछायेच्या ठिकाणी खंडग्रास ( partial) ग्रहण दिसते. चौथ्या प्रकारचे सूर्यग्रहण हे मिश्र प्रकाराचे (Hybrid)असते. यात काही भागात खग्रास तर काही भागात कंकणाकृती दिसते. हे ग्रहण दुर्मिळ असते. आताचे २५ ऑक्टोबर २०२२ ला होणारे ग्रहण हे खंडग्रास असून ग्रहणावेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३,७८,२६७ कि. मी. तर सुर्याचे अंतर १४,८७,८०,९३० कि.मी. असेल. यानंतर ९ वर्षाने भारतात केरळ मधून २१ मे २०३१ रोजी कंकणाकृती आणि काश्मीर येथून २० मार्च २०३४ रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसेल. त्यामुळे उद्याच्या ग्रहणाचे दर्शन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अतिनील किरणाच्या धोक्यामुळे सूर्यग्रहण हे कधीही उघड्या डोळ्याने, कँमेराने, द्विनेत्रीने किंवा दुर्बिणीने सरळ न पाहता उपकरणाच्या पुढे सुरक्षित फिल्टर लावूनच पाहावे. दुर्बिणीच्या डोळ्याच्या जवळील आयपीसला फिल्टर लावू नये. याची काळजी घ्यावी. यामुळे तात्पुरती किंवा कायमची डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. ग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित सुर्य चष्मे किंवा सुरक्षित काळ्या वेल्डिंग काचेतून पाहावे. दुर्बिणीतून आणि घरच्या लहान आरश्यातून सूर्याची प्रतिमा भिंतीवर घेवून तसेच पिन होल कॅमेरा तयार करून ग्रहण पहावे. यावेळी पश्चिम दिशेला सूर्यास्ताचे वेळी ग्रहण असल्याने निरीक्षण शिबिर घेताना किंवा घरून ग्रहण पाहताना क्षितिजावर सूर्यास्त पाहता येईल, अशी जागा निवडावी. खगोल संस्थांनी विद्यार्थ्यांना खगोल विज्ञानाची माहिती द्यावी, असे आवाहन सुरेश चोपणे यांनी केले आहे.
चंद्र- सूर्य ग्रहण या नियमित घडणाऱ्या खगोलीय घटना आहेत. केवळ हा सावल्यांचा खेळ असून याचा मानवी जीवनावर आणि शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही. उलट या खगोलीय घटना विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांनी पाहाव्यात. त्याचा अभ्यास करावा आणि विश्वाचे नियम समजून घ्यावे. गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये, ग्रहणात बाहेर निघू नये, जेवू, खावू नये, ग्रहण वाईट असते. अशा अंधश्रद्धावर विश्वास न ठेवता ग्रहण पहावे, असे आवाहन चोपणे यांनी केले आहे.
२५ ऑक्टोबररोजी संध्याकाळी ४.५२ ते ५-४२ वाजेपर्यंत चंद्रपूर येथून ५० मिनिटे खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. सूर्यास्ताचे वेळी होणाऱ्या ग्रहणाचे निरीक्षण शिबिर स्काय वॉच ग्रुपतर्फे चंद्रपूर शहरात, डॉ. पंजाबराव देशमुख हायस्कूल, वडगाव येथे ४ ते ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. खगोल अभ्यासक, विद्यार्थी तसेच पालक या सर्वांनी ग्रहण चष्मे आणि दुर्बिणीच्या माध्यमातून पाहावे. ज्यांना शिबिरात येणे शक्य नाही. त्यांनी सुरक्षित चष्मे किंवा फिल्टर्स काचा वापरून पाहावे.
देशातील प्रमुख शहरातून ग्रहण कितीवेळा दिसेल
(ग्रहण सुरूवात अंत / मोक्ष , एकूण काळ)
कोलकाता – ०४.४२ – ०५ .०३ (१२ मिनिटे),
वाराणसी – ०४ .४१- ०५ .२२ (४१ मिनिटे),
रायपूर- ०४.५१ – ०५.५३ ४१ (४१ मिनिटे),
भोपाल -०४.४२ – ०५.४६ (१ तास ५ मिनिटे)
दिल्ली – ४.२९- ०५.४२ (१ तास १३ मिनिटे),
राजकोट -०४.३८ – ०६.१४ (०१ तास ३६),
भूज – ०४.३४ – ०६.१७ (१ तास ४३ मिनिटे)
जम्मू – ०४.१७ – ०५.४६ (१ तास २९ मिनिटे),
श्रीनगर -०४.१५ – ५.४४ (१ तास २९ मिनिटे),
बंगलोर – ०५.१२ – ०५.५५ (४४ मिनिटे),
कन्याकुमारी – ०५.३२ – ०६.०० (२८ मिनिटे)
चेन्नई – ०५.१४ – ०५.४४ (३१ मिनिटे)
गडचिरोली – ०४.५२ – ०५.३९ (४७ मिनिटे),
भंडारा – ०४.४९ – ०५.३९ (५० मिनिटे),
गोंदिया – ०४.४९ – ०५.३७ (४८ मिनिटे),
चंद्रपूर – ०४.५२ – ०५.४२ (५० मिनिटे),
नागपूर – ०४.४९ – ०५.४२ (५३ मिनिटे ),
वर्धा – ०४.४९ ते ०५.४४ (५५ मिनिटे ),
यवतमाळ – ०४.५० – ०५.४६ (५६ मिनिटे),
अमरावती – ०४.४८ – ०५.४४ (५८ मिनिटे),
अकोला – ०४.४८ – ०५.५० (१ तास 2 मिनिटे),
वाशीम – ०४.५० – ०५.५१ (१ तास १ मिनिटे),
बुलढाणा – ०४.४८ – ०५.५४ (१ तास 6 मिनिटे)
जळगाव – ०४.४६ – ०५.५६ (१ तास १० मिनिटे),
परभणी – ०४.५१ – ०५.५३ (१ तास १ मिनिट),
पुणे – ०४.५१ – ०६.०५ (१ तास १४ मिनिटे),
बीड – ०४.५२ – ०५.५७ (१ तास ५ मिनिटे),
नंदुरबार – ०४.४४ – ०६.०१ (१ तास १७ मिनिटे),
नाशिक – ०४.४७ – ०६.०४ (१ तास १७ मिनिटे),
सोलापूर – ०४.५४ – ०६.०६ (१ तास १२ मिनिटे),
कोल्हापूर – ०४.५७ – ०६.०५ (१ तास ९ मिनिटे),
रत्नागिरी – ०४.५५ – ०६.०९ (१ तास १४ मिनिटे)
औरंगाबाद – ०४.५० – ०५.५९ (१ तास ९ मिनिटे)
मुंबई – ०४.४९ – ०६.०९ (१ तास २० मिनिटे)
पालघर – ०४.४७ – ०६.०८ (१ तास २१ मिनिटे)
हेही वाचलंत का ?