Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला पूर्ण बहुमत, जाणून घ्या पक्षनिहाय आकडेवारी

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला पूर्ण बहुमत, जाणून घ्या पक्षनिहाय आकडेवारी

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निर्विवाद कौल जनतेने काँग्रेसच्या बाजूने दिल्याने काँग्रेसने कर्नाटकात करिश्मा घडवला आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ता बदलण्याची परंपरा कायम राखत कर्नाटकने यावेळी काँग्रेसला एकहाती सत्ता बहाल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. सगळेच अंदाज खोटे ठरवत कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपला अपेक्षेइतक्याही जागा मिळवता आलेल्या नाहीत. मोदी-शहांचा करिश्मा कर्नाटकात न चालल्यामुळे त्रिशंकू विधानसभेचीही शक्यता फोल ठरली असून, काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Karnataka Election Result 2023)

कर्नाटक काँग्रेसमध्ये आनंदाचे भरते आले आहे. आता कुतूहल आहे ते मुख्यमंत्री कोण होणार याचे. माजी मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार ही दोन नावे आघाडीवर आहेत. पैकी यावेळी मुख्यमंत्रिपदाची माळ शिवकुमारांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. शिवकुमार लवकरच सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहेत. (Karnataka Election Result 2023)

आम आदमी पक्षानेही 218 जागांवर उमेदवार उभे केले होते; तर राष्ट्रवादी काँग्रेसने 9 मतदारसंघांत कौल आजमावला. मात्र, दोन्ही पक्षांना खाते उघडता आले नाही. 10 मे रोजी झालेले मतदान आणि त्याआधीच्या महिनाभराच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँगे्रसमध्ये
तीव्र चुरस पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या भाजपच्या दिग्गजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत कर्नाटकची सत्ताधार्‍यांना पुन्हा सत्ता न देण्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मोदींनी कर्नाटकात 19, तर शहांनी 16 सभा घेतल्या. त्याशिवाय दोघांचे 21 रोड शोही झाले. अध्यक्ष जे. पी. नड्डांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदी नेत्यांनी कर्नाटकात प्रचाराचे मॅरेथॉन दौरे केले; पण त्यांनाही भाजपला तारता आले नाही. प्रचारात भाजपने हिंदुत्वाचा आणि बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणेचाही वापर केला. काँग्रेसला सत्ता दिल्यास जातीय दंगे होतील, असा थेट आरोपही गृहमंत्री शहा यांनी केला होता; पण त्याचाही लाभ झाला नाही. त्यामुळेच राज्यात 38 वर्षांपासून प्रत्येक पाच वर्षाला सरकार बदलण्याचा ट्रेंड सुुरूच राहिला आहे. कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य भाजपकडे होते. तेही त्यांना आता गमवावे लागले आहे. त्यामुळे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाच्या महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागणार आहे.

शनिवारी झालेल्या मतमोजणीत विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसला 135, भाजपला 66 आणि निजदला 19 जागा मिळाल्या. रिंगणातील चौथा पक्ष आपले खाते उघडू शकला नाही. 113 हा बहुमताचा आकडा काँग्रेसने पार करत सत्तांतर केले आहे.

लोकसभेची नांदी

भाजप व काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. कारण, या निवडणुकीचा निकालच 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर परिणाम करणारा ठरेल, असे मानले जाते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेेची केली होती. त्यात काँग्रेसने बाजी मारली.

राष्ट्रवादी, 'आप'ला अपयश

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात 9 उमेदवार रिंगणात उतरवले होते. पैकी निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांनी भाजपला कडवी झुंज दिली. त्यांनी काही काळ आघाडीही मिळवली होती. मात्र, अखेर विद्यमान आमदार शशिकला जोल्लेंनी 7 हजारांवर मताधिक्याने इथून बाजी मारली. इथे काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार काकासाहेब पाटील तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यासह इतर आठ मतदारसंघांतही राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. 'आप'नेही कर्नाटकात 218 उमेदवार उभे केले होते. किमान पाच जागा मिळवण्याची आशा 'आप'ला होती; पण त्यांनाही खाते उघडता आले नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news