कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन | पुढारी

कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज (दि.१३) निकाल जाहीर झाला. यात सत्ताधारी भाजपला पराभूत करत काँग्रेसने बाजी मारली आहे. यात आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही तेथे कमी पडलो. त्या संदर्भात राज्य भाजप, केंद्रीय नेते मंथन करतील. अॅन्टी इन्कबन्सीमुळे आम्ही तेथे हरलो असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जिल्हा दूध संघात एका उद्घाटन समारंभानिमित्त मंत्री महाजन आले होते. त्यावेळी कर्नाटक निकालावर विचारले असता, ते म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीत बेळगावात आम्ही 10 जागांवर प्रचार केला. त्यापैकी सात उमेदवार निवडणूक येणे अपेक्षित असताना पाचच उमेदवार निवडून आले. आम्ही कर्नाटकात कमी पडलो. एखाद्या राज्यात काँग्रेस जिंकली म्हणजे काही बदल झाला असे नाही, उत्तर प्रदेशात काँग्रेस का निवडून आली नाही. बऱ्याच वर्षांनी काँग्रेसला विजय मिळाल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

तुम्ही तर वांझोटे आहात, संजय राऊत यांच्यावर महाजन यांची टीका

संजय राऊत यांनी बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली, असे सांगत भाजपवर टीका केली. त्यावर मंत्री महाजन यांनी पलटवार केला. ते म्हणाले संजय राऊतांनी राज्यात काहीतरी करुन दाखवावे. तुम्ही कुठे आहात, भविष्यात कोठे रहाल, याचा शोध त्यांनी घ्यावा. उगाच तोंडसुख घेत आहेत. बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना, शेजाऱ्याला मुलगा झाला म्हणून पेढे वाटायचे, तुमच्या घरात काय आहे. तुम्ही तर वांझोटे आहात, तिकडे लक्ष घालावे, असा टोला महाजनांनी लगावला.

हेही वाचा 

Back to top button