निवडणूक निकालावरून काँग्रेसमध्ये गोंधळ

Congress
Congress

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये निकालावरूनही गोंधळ असल्याचे समोर आले. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश आणि लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तीन राज्यातील काँग्रेसच्या पराभवाची निराशा संसदेतही दिसली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांची लोकसभेमधील अनुपस्थिती देखील या पराभवाच्या पार्श्वभुमीवर उठून दिसली. काँग्रेस आणि अन्य विरोधी खासदारही भाजपच्या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दिसले.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मधील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस पक्ष या राज्यांमधील निकालांचा अभ्यास करेल आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जर काही तक्रारी असतील तर त्याचेही निराकरण करेल. तसेच काँग्रेस या निकालाचे आत्मपरीक्षण करेल. काँग्रेसला ही राज्य जिंकण्याची अपेक्षा होती. दरम्यान इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या काही तक्रारी असतील तर त्या विचारात घेतल्या जातील. त्यातील काही तक्रारी खऱ्या असू शकतात. त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असू शकते, तेही केले जाईल, असेही ते म्हणाले.

पाच पैकी तीन राज्ये भाजपने मिळवली तर काँग्रेसला तेलंगणा हे एकमेव राज्य मिळवता आले. यावर प्रतिक्रिया देताना जयराम रमेश म्हणाले की, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक आणि अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, हे खरे आहे. पण काँग्रेसच्या मतांची टक्केवारी भाजपच्या फार दूर नाही. आकड्यांचे हे अंतर कमी केले जाऊ शकते. हे आकडे परत येण्यासाठी आशादायी आहेत. तर अधीर रंजन चौधरी यांनी हा विजय कोणाचा म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपच्या नेत्यांच्या वतीने या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आले. या गोष्टीचा आधार घेत अधीर रंजन चौधरी यांनी हा विजय कोणाचा यावर विश्लेषण करणे पसंत केले. मात्र आपण का हरलो किंवा काँग्रेस पक्ष कुठे कमी पडला, यावर बोलणे मात्र त्यांनी टाळले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भाजप सतत म्हणत आहे की, हा विजय पंतप्रधान मोदींचा आहे. ते म्हणत नाहीत की हा विजय भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषदेचा आहे. मला जे सांगायचे होते तेच पंतप्रधान मोदी काल म्हणाले. हा विजय सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, सुशासनाचा, महिलांचा आहे. तेव्हा भाजपने ठरवावे की हा विजय कोणाचा? अशी प्रतिक्रिया अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.

निवडणूक निकालावर एकीकडे के. सी. वेणुगोपाल म्हणतात की, या निकालांचा अभ्यास केला जाईल. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. तर दुसरीकडे जयराम रमेश यांनी मतदानाच्या टक्केवारीच्या आकड्यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपमध्ये किती कमी फरक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसचेच लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी या विजयावरून भाजपामध्ये काय चालले आहे, यावर बोलत आहेत. मात्र पाचपैकी तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले, काँग्रेसला ते मिळू शकले नाही. काँग्रेस कुठे कमी पडली, काँग्रेसने काय करायला हवे होते, यावर काँग्रेस बोलताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक निकालावरही काँग्रेसमध्ये एकमत नसून गोंधळ असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news