NCP Crisis : सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद अवैध, अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद | पुढारी

NCP Crisis : सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद अवैध, अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कुणाचा यावर निवडणूक आयोगात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी झालेली निवड घटना विरोधी आहे. तसेच शरद पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्रही खोटे आहेत, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. तर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी कशी होऊ शकते, असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला.  यावरील पुढची सुनावणी मंगळवारी (५ डिसेंबर) पार पडणार आहे. (NCP Crisis)
सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरावरील २८ पैकी २० पदाधिकारी हे शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीमधील ८६ पैकी ७० सदस्य हे शरद पवारांसोबत आहेत. तसेच अजित पवार गटात गेलेल्या सर्व आमदारांच्या एकूण मतदानाच्या तुलनेत शरद पवार यांच्याकडे राहिलेले आमदार आणि खासदार तसेच पराभूत उमेदवार यांचे मतदान अधिक आहे. असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला. तसेच पुन्हा एकदा निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा उल्लेख करत आम्ही सादर केलेले सर्व प्रतिज्ञापत्र खरे आहेत. समोरच्या गटाकडून म्हणजेच अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्रांमध्ये २४ प्रकारचे खोटे प्रतिज्ञापत्र आहेत. निवडणूक आयोग हे प्रतिज्ञापत्र तपासून पाहू शकते, असाही युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला. (NCP Crisis)
NCP Crisis : जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पद हे अवैध 
त्याचबरोबर जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पद हे अवैध आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला. या युक्तीवादाला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी दिलेले एबी फॉर्मच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी वापरले, असेही शरद पवार गटाकडून यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, शरद पवार सोडून राष्ट्रवादी काँग्रेस होऊ शकत नाही. शरद पवारांनी अनेक वेळा मुख्यमंत्री, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री या पदावर काम केले आहे. त्यांनी या पक्षाची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस कशी होऊ शकते, असा सवाल देखील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला.
शरद पवार गटाच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी आपली बाजू मांडली. मुकुल रोहतगी यांनी एक प्रतिज्ञापत्र देणाऱ्याचा मृत्यू झाला म्हणून मेरिट कमी होते का, एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला म्हणजे मेरिट कमी झाले असे म्हणायचे का, असे सवाल उपस्थित केले. तसेच दोन्ही बाजूंचे प्रतिज्ञापत्र तपासा अशी मागणी देखील मुकुल रोहतगी यांनी केली. दरम्यान प्रतिज्ञापत्राच्या मुद्द्यावर शरद पवार गटाकडून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत, असे सांगत अजित पवार गटाने ते निवडणूक आयोगासमोर दाखवले. त्याचबरोबर आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ३० जून रोजीच अजित पवार यांना समर्थन दिले आहे. मात्र १९ ऑक्टोबरला मनोहर चंद्रिकापुरे यांना शरद पवार गटाने जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितले, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
सोमवारी पार पडलेल्या या सुनावणीला शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील भुसारा, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख उपस्थित होते. अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे, पार्थ पवार, नजीब मुल्ला उपस्थित होते.
यापूर्वीच्या सुनावणीत अजित पवार गटाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र खोटे आहेत. त्याची विभागणी २४ प्रकारात करण्यात आली आहे. झोमॅटो बॉय, सेल्स मॅनेजर अशी पदे दाखवण्यात आली आहेत, असे शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आले होते. तसेच अजित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दावा करणे, हे विश्वासघातकी आहे, असाही युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता.
आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. यात शरद पवार गटाकडून जुन्याच गोष्टी पुन्हा सांगितल्या गेल्या. शरद पवार गटाच्या खोटया प्रतिज्ञापत्रांची माहिती आमच्या वकिलांनी पुराव्यानिशी दाखवली. आज आमचा युक्तिवाद अपूर्ण राहिला, उद्या तो पूर्ण होईल.
– सुनील तटकरे,  प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट
हेही वाचा 
 

Back to top button