दहशतवादी हाफिज सईदवर ‘यूएपीए’ अंतर्गत आरोप निश्चित करा! : एनआयए न्यायालयाचे आदेश

मोस्ट वाॅन्टेड हाफिज सईदच्या
मोस्ट वाॅन्टेड हाफिज सईदच्या

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने शनिवारी लष्कर-ए-तैयबाचा मोरक्या हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि हिजबुल मुजाहिद्दीन प्रमुख सय्यद सलाउद्दीन, यासिन मलिक, शब्बीर शाह, मसरत आलम यांच्यासह अनेक काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर 'यूएपीए'च्या विविध कलमांखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यातील अनेक आरोपी पाकिस्तामध्ये तर काही भारतीय तुरुंगात बंद आहे. हे प्रकरण जम्मू-काश्मीर मध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवादी तसेच फुटीरतावाद्यांना मदत केल्यासंबंधी दाखल करण्यात आले होते.

एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी १६ मार्चला जारी केलेल्या आदेशानूसार साक्षीदारांची साक्ष तसेच कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींनी एकत्रित येत दहशतवादी तसेच दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याचे स्पष्ट होते. यासोबत आरोपींचे दहशतवादी आणि पाकिस्तानमधील संस्थांसोबत जवळचे संबंध आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आर्थिक पोषण करण्यासाठी पाकिस्तानकडून पैसे पुरवण्यात आले होते. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदने देखील पैसे पाठवल्याचे एनआयए न्यायालयाने म्हटले आहे. दहशतवादी फंडिंगसाठीचा पैसा पाकिस्तान आणि त्याच्या एजन्सींनी पाठवला होता. राजनयिक मिशनचा वापर नापाक योजना पूर्ण करण्यासाठी केला गेला होता, असे न्यायालयाने नमूद केले.

एनआयए न्यायालयाने काश्मीरचे नेते तसेच माजी आमदार इंजिनियर, व्यावसायिक जहूर अहमद शाह वटाली, बिट्टा करोट, आफताब अहमद शाह, अवतार अहमद शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ पीर सेफुल्लाह तसेच इतरांवर आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासर्वांवर यूएपीए कायद्यासह भारतीय दंड विधानाअंतर्गत विविध कलमान्वे गुन्हेगारी कट रचणे, देशाविरोधात युद्ध पुकारणे असे खटले चालणार आहेत.

हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड

हाफिज सईद (Hafiz Saeed)  हा संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी आहे. अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची मुखवटा घातलेली संघटना आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी लष्कर जबाबदार आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ जणांना जीव गमवावा लागला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही त्याला डिसेंबर २००८ मध्ये दहशतवादी घोषित केले होते.

हेही वाचलंत का ? : 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news