केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव अयोग्यरित्या घेतल्याचा दावा करीत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेत्या स्मृती इराणीविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दिली आहे. इराणी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चौधरी यांनी पत्रातून अध्यक्षांकडे केली आहे. लोकसभेत इराणी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान ओरडत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. राष्ट्रपतींच्या नावासमोर 'मॅडम' अथवा 'श्रीमती' शब्दाचा वापर करण्यात आला नाही. हा देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या मुर्मू यांचा अपमान असल्याचे चौधरी म्हणाले.

श्रीमती स्मृती इराणी सभागृहात ज्याप्रकारे राष्ट्रपती महोदयांचे नाव घेत होत्या, ते योग्य नव्हते. त्या राष्ट्रपतींना 'मॅडम' अथवा 'श्रीमती' सारख्या आदरसूचक शब्दांचा वापर न करता वारंवार 'द्रौपदी मुर्मू' असे नाव घेत ओरडत होत्या. हे माननीय राष्ट्रपतींच्या पदाचा आदर कमी करण्यासारखे आहे. इराणी यांच्याकडून उल्लेखण्यात आलेल्या या शब्दांना सभागृहाच्या कार्यवाहीतून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी देखील पत्रातून चौधरी यांनी केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत करण्यात आलेल्या दुर्व्यवहारचा उल्लेख देखील चौधरी यांनी पत्रातून केला. माझ्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यासंबंधी अनावश्यकरित्या सोनिया गांधी यांना ओढण्यात आले. सभागृहात कामकाजानंतर ज्याप्रकारे एक वरिष्ठ खासदार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत वर्तन करण्यात आले. ते सभागृहाच्या प्रतिमेला साजेसे नाही. केंद्रीय मंत्री इराणी तसेच सत्ताधारी भाजपचा व्यवहार संसदीय पंरपरेला अनुसरून नसल्याचे देखील चौधरी म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news