भविष्यात मानवी मेंदूही होईल ‘हॅक’! अमेरिकेतील वैज्ञानिकांकडून तंत्रज्ञान विकसित | पुढारी

भविष्यात मानवी मेंदूही होईल ‘हॅक’! अमेरिकेतील वैज्ञानिकांकडून तंत्रज्ञान विकसित

वॉशिंग्टन : तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. मनुष्य त्याचा कसा वापर करतो यावर सर्व काही अवलंबून आहे. स्मार्टफोन ही खरे तर चांगलीच उपयुक्त वस्तू आहे; पण तिचाही सध्या कसा व किती प्रमाणात गैरवापर सुरू असतो हे आपल्याला दिसतेच. शिवाय स्मार्टफोनचा वापर करणार्‍यांना ‘हॅकिंग’ या प्रकाराचीही माहिती असेल. आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे असे कुणीही म्हणू शकत नाही. मात्र, आपल्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरप्रमाणे जर आपला मेंदूही हॅक होऊ लागला तर? भविष्यात असेही घडू शकते!

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्राने मानवी मेंदूही नियंत्रित करता येऊ शकेल. सध्या हे तंत्रज्ञान विकासाच्या टप्प्यावर आहे. त्यामध्ये एका ट्रान्समीटरला छोट्याशा उपकरणात बसवून तो मानवी शरीरात सोडला गेल्यावर हे तंत्रज्ञान पूर्णपणे वायरलेस होते. वैज्ञानिकांनी सुरुवातीच्या चाचण्यांसाठी या ‘माईंड रीडिंग टेक्नॉलॉजी’साठी एक हेडसेट विकसित केले आहे. हे हेडसेट मेंदूतील न्यूरॉन ‘वाचू’ शकते. विशेष म्हणजे रिसिव्हर हेडसेट लावलेल्या व्यक्तीच्या मेंदूला आपल्या पद्धतीने नियंत्रितही करू शकतो.

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि डिफेन्स अ‍ॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने हा हेडसेट बनवला आहे. त्याला त्यांनी ‘मॅग्नेटिक ऑप्टिकल अकॉस्टिक न्यूरल अ‍ॅक्सेस’ असे नाव दिले आहे. मानवाआधी या तंत्राचा वापर माश्यांवर केला जात आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात असे दिसून आले की हेडसेट अ‍ॅक्टिव्ह होताच माशीने पंख फैलावणे सुरू केले.

Back to top button