माझा घातपात घडविण्याचे कारस्थान; अशोक चव्हाण यांच्या तक्रारीमुळे खळबळ

माझा घातपात घडविण्याचे कारस्थान; अशोक चव्हाण यांच्या तक्रारीमुळे खळबळ

नांदेड; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या बाबतीत घातपात घडविण्याचे कारस्थान दिसून येत असल्याची लेखी तक्रार नांदेड पोलीसांकडे आज (दि.२०) केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून आपल्या नावाने बनावट पत्रे तयार केली जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आमदार चव्हाण गेल्या तीन दिवसांपासून नांदेड मुक्कामी असून आज दुपारी ते धर्माबादजवळील एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यापूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार पांडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी तक्रार नोंदविली. स्वतःच्या बाबतीतील एखाद्या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदविण्याचा प्रसंग चव्हाण यांच्यावर प्रथमच ओढवला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

विद्यमान सरकार सत्तेत येण्यापूर्वी अशोक चव्हाण हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून बनावट पत्रे तयार केली असल्याची बाब चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर अशाच एका बनावट लेटरहेडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक बनावट पत्र आढळून आल्यानंतर चव्हाण यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेत लेखी तक्रार दिल्यानंतर खळबळ उडाली.
तक्रारीत चव्हाण यांनी मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी व भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. तसेच सदर व्यक्ती पाठलाग करून आपल्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून आपला घातपात घडविण्याचे कारस्थान असल्याची शंका व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ठळक झाले आहे.

अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री असताना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. त्याआधी शंकरराव चव्हाण यांच्या केंद्रीय गृहमंत्रिपदाच्या काळातही चव्हाण कुटुंबाने उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था अनुभवली होती. अलीकडच्या काळात पोलीस प्रशासनाने त्यांना वाय प्लस सुरक्षेसह एस्कॉर्ट व्यवस्थाही उपलब्ध करून दिली होती. आता चव्हाण यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलेल्या तक्रारीत घातपात घडण्याची भीती व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण गंभीर झाल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी माध्यमांशी थेट संवाद साधला नाही. पण त्यांच्या प्रसिद्धीविषयक यंत्रणेनेच अधिकृत निवेदन जारी करून चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीची माहिती माध्यमांना दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news