पुढारी ऑनलाईन डेस्क : मारिओपोल शहरातील प्रसूती रुग्णालयात बाॅम्बस्फोट करण्यात आला, इतकंच नाही तर बाॅम्बस्फोटापासून बचावासाठी ज्या थिएटरमध्ये १ लाख नागरिकांनी आश्रय घेतला होता, तिथेही गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांमागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे लष्कर प्रमुख कर्नल मिझिंतसेव्ह यांचा हात होता, असा आरोप युक्रेनने केला आहे. (रशियाचे कर्नल मिझिंतसेव्ह)
कर्नल मिझिंतसेव्ह हे रशियन नॅशनल सेंटर फॉर डिफेन्स मॅनेजमेंटचे संचालक आहेत, त्यांना 'बुचर ऑफ मारिओपोल' म्हणूनही ओळखले जाते. ओडेसा लष्करी प्रशासनाचे प्रवक्ते सेर्गेई ब्रॅचुक यांनी म्हटले आहे की, "रशियाच्या उच्च दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मारिओपोलमध्ये अनेक विनाशकारी हल्ल्यांचे आदेश दिले, ज्यामुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांनी प्रसूती रुग्णालय, मुलांचे रुग्णालय, नाटक थिएटर आणि नागरी घरांवर बॉम्बफेक करण्याचे आदेश दिले", असे आरोप ब्रॅचुक यांनी केलेले आहे.
ब्रॅचुक म्हणतात की, "रशियन सैन्याच्या प्रमुखांकडून, ज्या पद्धतीने सीरियन शहरांचा नाश केला, तसाच नाश मारिओपोल शहराचा केला जात आहे. हे प्रमुख युक्रेन नागरिक असलेल्या शहरात 'मास टेरर' घडवून आणत आहेत. त्यामुळे त्यांना 'डाकू' किंवा 'न्यूओ नाझी', असंच म्हणावे लागत आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या ब्रीफिंगमध्ये, त्यांनी मारियुपोल शहरातील रहिवाशांना शरण येण्याचे आवाहन केले. जे शरण आले त्यांना अभय देण्यात आले."
युक्रेनने सांगितले की, "शहराबाहेर नागरिकांच्या संरक्षणासाठी जे काॅरिडाॅर तयार करण्यात आले होते, त्यावरही रशियन सैन्याने हल्ला केल्यामुळे ते काॅरिडोर उद्ध्वस्त करण्यात आले." रशियन सेनाप्रमुख कर्नल मिझिंतसेव्ह यांच्या क्रूरतेमुळे त्यांना ऑस्ट्रियातील युक्रेनचे माजी राजदूत अलेक्झांडर शेरबा यांनी कर्नल मिझिंतसेव्ह यांना 'मारिओपोलचा कसाई', असं म्हटले आहे.
क्रूरकर्मा रशियन सेना प्रमुख कर्नल मिझिंतसेव्ह
यापूर्वी कर्नल मिझिंतसेव्ह यांनी २०१५-१६ साली जे विनाशकारी सीरियन गृहयुद्धांची आखणी केले. सीरियाचे क्रूर अध्यक्ष बशर अल असद यांना पाठिंबा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रशियन सैन्याने अलेप्पोला वेढा घालण्यासह हवाई हल्ले केले होते, ज्यामध्ये तब्बल १६४० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर अलेप्पोमध्ये जो गोळीबार झाला होता, त्यातही कर्नल मिझिंतसेव्ह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
एप्रिल २०१६ मध्ये एकाच घटनेत शहरातील हॉस्पिटलवर जो हल्ला करण्यात आला, त्यातही ५३ लोक ठार झाले होते. रशियन सैन्याने सीरियातील बिल्ट-अप शहरी भागात क्लस्टर युद्धसामग्री आणि बॅरेल बॉम्बचा वापर करून नागरिकांना ठार केले. सरकारी सैन्याने अलेप्पोमध्ये विनाशकारी वायू हल्ल्यांच्या मालिकेत क्लोरीन सोडले होते.
७ एप्रिल २०१८ मध्ये सीरियाच्या डोमा शहरात रासायनिक हल्ला करण्यात आला, ज्यात जवळपास ५० लोकांचा मृत्यू झाला. तर १०० जखमी झाले होते. याचाही दोष रशियाचे समर्थन असणाऱ्या सीरियन आर्मीवर ठेवण्यात आला होता, असे अनेक क्रूरपणाचे आरोप रशियन नॅशनल सेंटर फॉर डिफेन्स मॅनेजमेंटचे संचालक कर्नल मिझिंतसेव्ह यांच्यावर करण्यात आले आहेत.
उद्ध्वस्त झालेले युक्रेनमधील मारिओपोल शहर
युक्रेनच्या आग्नेय दिशेला रणनितीदृष्ट्या महत्वाचे शहर असलेल्या मारिओपोल शहरावर २४ फेब्रुवारीला रशियाकडून हल्ले करण्यात आले. आजही या शहराला सतत बाॅम्बस्फोट आणि गोळीबाराचा सामना करावा लागत आहे. अपोकॅलिप्टिक ड्रोन फुटेज शहराचे किती नुकसान झाले हे स्पष्ट दाखवते. तर एका अधिकाऱ्याने त्याचे वर्णन 'मृत भूमीची राख' असे केले आहे.
ट्विटरवर सामायिक केलेल्या डॅशकॅम फुटेजमध्ये पूर्व युरोपीय वृत्तसंस्था व्हिसेग्राडने या शहराचे निर्जन, उध्वस्त लँडस्केप असे वर्णन करत म्हटले आहे की, "मारिओपोल हे शहर भूतासारखे दिसते." ह्युमन राइट्स वॉचने शहरातील परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे की, "मृतदेहांनी भरलेले आणि नष्ट झालेल्या इमारती" असे शहर दिसत आहे. एका टेलीग्राम पोस्टमध्ये सांगितले की, "मारिओपोलच्या सिटी कौन्सिलकडून सांगण्यात आले आहे की, शहरातील सहापैकी पाच रुग्णालये नष्ट झाली आहेत. दररोज १०० नवीन रुग्णांना उपचारांची आवश्यकता आहे."
सध्या या शहरातील वीज खंडित झाल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना डाॅक्टर मेणबत्तीचा आधार घेत आहेत. डिझेलचा जनरेटर सुरू करत रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत. युक्रेनच्या नागरी स्वातंत्र्य केंद्राच्या प्रमुख ओलेक्झांड्रा मॅटविचुक यांनी कर्नल मिझिंतसेव्ह यांना हेग येथे युद्ध गुन्ह्याच्या आरोपांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, "सर्वांनी लक्षात ठेवा. हा मिखाईल मिझिनत्सेव्ह आहे. तो मारिओपोल शहरावर मोठ्या प्रमाणात संहार करत आहे. त्यानेच लहान मुलांच्या रुग्णालयावर, नाट्यगृहावर बॉम्बफेक करण्याचे आदेश दिले होते. त्याला सीरियातील शहरे उद्ध्वस्त करण्याचा मोठा अनुभव आहे."
हे वाचलंत का?