Russia-Ukraine war : रशियाचे जहाज ‘ओर्स्क’ युक्रेनने केले उद्ध्वस्त | पुढारी

Russia-Ukraine war : रशियाचे जहाज ‘ओर्स्क’ युक्रेनने केले उद्ध्वस्त

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine war) 29 व्या दिवशी युक्रेनने रशियाचे जहाज ‘ओर्स्क’ उद्ध्वस्त केले. या जहाजातून मारियुपोल येथील रशियन सैनिकांना शस्त्रास्त्रे पोहोचविली जात होती. दरम्यान, रशियन सैनिकांनी युक्रेनच्या इज्युम या शहरावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे.

युद्धाबाबत फेक न्यूज प्रसारित केल्यावरून रशियाने गुगलच्या न्यूज सेवेवर बंदी घातली आहे, तर ‘नाटो’ने युद्धात आतापर्यंत 15 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. रशियाने दोन मार्चनंतर मृत सैनिकांची अधिकृत आकडेवारी जारी केलेली नाही. 2 मार्चपर्यंत 500 सैनिक मारले गेल्याचे रशियाने म्हटले होते.

‘नाटो’ने युक्रेनला आण्विक, रासायनिक, जैविक आणि रेडिओलॉजिकल हल्ल्यापासून बचावासाठी सामग्री पाठविणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच इंग्रजीतून जगाला युक्रेनसोबत उभे राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियातील व्हिडीओ संदेशात ते म्हणतात, आपण सर्वांनी मिळून रशियाला रोखले पाहिजे. जगाने युद्ध रोखले पाहिजे. स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. घर, कार्यालयातून बाहेर पडा, युक्रेनला साथ द्या.

संयुक्‍त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत तटस्थ

युक्रेनमधील स्थितीबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसुदा सादर करण्यात आला. यावेळी भारताने पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली. भारतासह 13 देशांनी या मसुद्यावरील मतदानात भाग घेतला नाही. चीन आणि रशियाने या कृतीला पाठिंबा व्यक्त केला.

ताज्या घडामोडी रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war)

* झेलेन्स्की यांची ‘नाटो’कडे आणखी शस्त्रास्त्रे पुरविण्याची मागणी केली.
* रशियाच्या हल्ल्यामुळे 3.5 मिलियन नागरिक विस्थापित झाले असून त्यापैकी एक लाख विस्थापितांना सामावून घेऊ, त्यांचे अमेरिकेत स्वागत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
* रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.
* रशियन सेंट्रल बँकेच्या सोन्याच्या वापरावर जी-7 राष्ट्रांनी निर्बंध लादले.

Back to top button