मॉस्को/कीव्ह : वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) सहाव्या दिवशी रशियन फौजांनी केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सुमी प्रांतातील एका रासायनिक प्रकल्पातून अमोनियाची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाच किलोमीटर परिघातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा रशियाने कीव्हमधील शॉपिंग मॉलवर केलेल्या बॉम्बफेकीत सहा जणांचा मृत्यू झाला तर ढिगार्याच्या खाली गाडल्या गेलेल्या एका व्यक्तीला वाचविण्यात आले.
मारियुपोल शहरावर पूर्ण ताबा मिळविण्यासाठी रशियन लष्कराने दिलेली शरणागतीची डेडलाईन संपली आहे. युक्रेनने शरणागतीचा प्रस्ताव यापूर्वीच फेटाळला होता. युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेस्चुक यांनी सांगितले की, शरणागतीचा प्रश्नच येत नाही. यावर चर्चाही होऊ शकत नाही. आम्ही रशियाला हे यापूर्वीच कळवले आहे. रशियाने 8 पानी पत्रावर वेळ घालविण्यापेक्षा ह्युमन कॉरिडॉर खुला करायला हवा.
इस्रायलने क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा द्यावी : झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी इस्रायलच्या संसदेला व्हिडीओ लिंकद्वारे संबोधित केले. ज्यू असलेल्या झेलेन्स्की यांनी इस्रायलला युक्रेनी ज्यूंचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की म्हणाले की, इस्रायलची आयरन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टीम सर्वोत्तम आहे, हे सर्वांनाच माहिती आहे आणि तुम्ही आमची मदत करणार हे ही सर्वांना माहिती आहे. ती यंत्रणा आम्हाला द्यावी. यापूर्वी ही यंत्रणा न दिल्यावरून त्यांनी प्रश्नही उपस्थित केले. त्यावर इस्रायलचे परराष्ट्र मंत्री याईल लॅपिड म्हणाले, युक्रेनला शक्य ती मदत करू.
मारियुपोल रशियासाठी महत्त्वाचे
2014 मध्ये रशियाने क्रीमियाचा घास गिळला. पण भूमीच्या सलगतेने रशिया क्रीमियाला जोडला गेलेला नव्हता. मारियुपोलवर ताबा मिळाल्यास क्रीमिया उपखंडापर्यंत जाण्याचा रस्ते मार्ग रशियाला उपलब्ध होतो. त्यामुळे मारियुपोल रशियाला महत्त्वाचे वाटते. रशियाने मारियुपोल 80 टक्के उद्ध्वस्त केले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध ताज्या घडामोडी (Russia-Ukraine War)
रशियाने युक्रेनच्या एका लष्करी प्रशिक्षण मैदानावर दोन क्षेपणास्त्रे डागली.
रशियाचे एक विमान, दोन क्रुझ मिसाईल उद्ध्वस्त केल्याचा युक्रेनचा दावा.
चीन युक्रेनला 1.57 मिलियन डॉलरची मदत करणार.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कीव्हचा दौरा करण्याची शक्यता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन शुक्रवारी पोलंडला जाणार. नाटो आणि युरोपीय संघासोबत युक्रेन मुद्यावर चर्चेची शक्यता.
युक्रेन प्रशासनाने रशिया समर्थक विरोधी पक्षनेते मेदवेदचूक यांच्या पक्षासह 11 पक्षांची नोंदणी रद्द केली.
युक्रेनसंबंधी दोन याचिका सुप्रीम कोर्टाकडून बंद
नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधी दाखल केलेल्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने बंद केल्या आहेत. युद्धभूमी युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 22 हजार 500 विद्यार्थी तसेच भारतीय नागरिकांना मायदेशी आणले असून अभियान पूर्णत्वास आल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी न्यायालयाला दिली.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनंतर यासंंबंधी दाखल याचिका बंद करण्याचा निर्णय घेतला. युक्रेनमध्ये गेल्या 25 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धभूमीतून परतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातच शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला आहे.
सरकार यासंबंधी विचार करीत असून यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. केवळ युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणलेले नाही तर त्यांचा अभ्यास सुरू राहावा, याअनुषंगाने सरकार विचार करीत आहे, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
अधिवक्ते विशाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल करीत युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. बंगळूरच्या फातिमा अहाना यांनीदेखील यासंबंधी याचिका दाखल केली होती.