लोणी : सहकार चळवळ लोकशाहीचे उत्तम उदाहरण : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

लोणी : सहकार चळवळ लोकशाहीचे उत्तम उदाहरण : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Published on
Updated on

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सहकार चळवळ भारतीय लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. संघटीत राहिलो तर काय होवू शकते, हे या चळवळीने दाखवून दिले असे सांगत, शेतकर्‍यांसह महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्राने दिलेले योगदान मोठे आहे. विकसनशील भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान खुप मोठे असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.
प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंमळनेर येथील नियोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे होते. व्यासपीठावर महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., खा. डॉ. सुजय विखे पा., प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पा., आ. बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, अ. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., माजी मंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

'तुम्हा सर्व बंधू-भगिनींना नमस्कार,' अशा मराठी भाषेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भाषणाला सुरूवात केली. पुढे म्हणाले, देशात सहकार चळवळ यशस्वी झाली. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सहकार क्षेत्राला पुनर्जीवित करण्याचे काम शासन करीत आहे. संघटीत राहून काम करणे हे सहकार चळवळीचे मर्म आहे. सहकारातून समृद्धीकडे हा देशाचा मूलमंत्र आहे.

भारताने नेहमीच साहित्यीक परंपरा पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. सहकार चळवळ म्हणजे खर्‍या अर्थाने संगिताची एक धुन आहे. या चळवळीने शेतकर्‍यांमध्ये विश्वास जागविला. सहकारी समित्यांना पुढे नेले. त्यामुळेच सहकारातून समृध्दी साध्य करण्यास मोठा पुढाकार घेतला जात असून, श्रमीक आणि उद्योजक या दोघांच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्यामुळेच देश मजबुत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. हे सरकार शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे आहे. अडचणीच्या काळात शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. श्रीसाईबाबा चरणी चांगला पाऊस पडावा, यासाठी साकडे घातले आहे. एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दांमध्ये त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात आज भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. सहकार क्षेत्राला 10 हजार कोटी रुपयांची कर माफी देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेऊन ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सहकार चळवळ उभी करणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे रोपटे लावले. त्याचा वटवृक्ष झालेला आज आपण पाहत आहोत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.

नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे म्हणाले, मराठी संत साहित्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी साहित्यांच्या माध्यमातून गोर गरिबांच्या दुःखाला वाचा फोडली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बानकुळे म्हणाले की, ज्यावेळी लोकशाही धोक्यात होती त्यावेळी तुरुंगात राहून लोकशाही मजबुत करण्याचे काम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहतो. संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयामुळेच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न मजबुत होत असल्याचे नमुद करुन, या भागात सहकार चळवळीने मोठे काम झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शासकीय लाभार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता भारत मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतीना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी स्वागत व प्रास्ताविकातून या पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका विशद केली. साहित्यिक आणि कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी आभार मानले.

यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने सर्व पुरस्कार दिले जातात. यामध्ये 2023 या वर्षासाठी साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार – सोलापूर येथील डॉ. निशिकांत ठकार, प्रबोधन पुरस्कार – पुणे येथील अशोक चौसाळकर यांना समाज प्रबोधन पत्रिकेसाठी देण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – 'महानुभाव वाड्मय : चिकित्सक समालोचन खंड 1 व 2 ' या ग्रंथासाठी पुणे येथील डॉ. शैलेजा बापट यांना तसेच राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार – 'मूल्यत्रयीची कविता' या कवितासंग्रहासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांना देण्यात आला.

नाट्यसेवेबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार – जळगाव येथील शंभू पाटील यांना तर कला क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार- पुणे येथील वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार – 'श्री ज्ञानेश्वर दर्शन भाग 1 व 2' या ग्रंथाच्या संपादनासाठी श्रीरामपूर येथील प्रा. डॉ. शिरिष लांडगे यांना तर अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार – 'भंडारदरा धरण शतकपूर्ती ' या पुस्तकासाठी भंडारदरा येथील विकास पवार यांना, प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार – 'ते दिवस आठवून बघ' या कवितासंग्रहासाठी कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांना देण्यात आला. पुरस्कार्थी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.निशिकांत ठकार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

अ. नगरच्या के. के. रेंजप्रश्नी सिंह यांचा दिलासा

जिल्ह्यातील के. के. रेंजच्या प्रश्नावर भाष्य करताना संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील या दोघांनीही या विषयाबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. या संपूर्ण विषयासाठी मी संबंधितांची बैठक बोलविणार आहे. आम्हाला शेतकर्‍यांचे हित पहायचे आहे, असे स्पष्ट आश्वासित करुन, त्यांनी जिल्ह्यातील के. के. रेंजप्रश्नावर मोठा दिलासा दिला.

विखे पा. बजबुत मंत्री तर खा. विखे यशस्वी..!

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.बावनकुळे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राज्य सरकारमध्ये सर्वात मजबुत मंत्री व भाजपाचे प्रमुख नेते, असा तर केंद्राच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणारा यशस्वी खासदार असा उल्लेख त्यांनी खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या कार्याबद्दल केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news